top of page
  • Writer's pictureRaginee K

छायाचित्रकार आणि ती
अवकाशाच्या पटलावर नाद आणि बिंदूंच्या रूपाने सृष्टीचा खेळ सुरु झाला. आणि प्रकृतीच्या नर्तनातून मायेचे आवरण या सृष्टीवर पांघरले गेले तसे अपूर्ण - पूर्णत्वाकडे प्रवाहित होऊ लागले. स्त्री स्वरूपात साक्षात शक्तीच धरणीवर अवतरली. प्रत्येक पिढीत कोणासाठी ती फक्त एक स्त्री, कोणासाठी एक हवीहवीशी वाटणारी व्यक्ती. प्रत्येकजण आपापल्या भावना, लालसा तिच्यावर प्रक्षेपित करून स्वतःचा शोध तिच्यात घेत होते. त्यांच्यातील कलाकार मात्र कधी काव्य, चित्रे तर शिल्प तयार करीत होते. आणि मानवातील भावना व्यक्त करून पुढच्या पिढीस शिक्षित करीत होते. ती स्वतःतच परिपूर्ण. या धरित्रीशी सृजनाच्या आणि चंद्राशी ऋतुचक्राच्या माध्यमातून घट्ट बांधली गेलेली. जसे त्याला कलानिर्मितीच्याद्वारे पूर्णत्वाची आस पण ती मात्र स्वतःतच परिपूर्ण निर्माती. देहाच्या माध्यमातून निर्मिती करणारी निर्माती. अनादी अनंताच्या चक्रात बांधले गेलेले ते दोन जीव एकमेकांत अनंताचे अविष्कार कलेच्या माध्यमातून शोधत प्रवाह मग्न. काळ, स्थळ आणि अविष्कार बदलले तरीही ते दोघे कायमच निर्मितीच्या डोहात आकंठ बुडालेले.एक दिवस त्याला प्रश्न पडला. अजिंठा, खजुराहो, बेलूर येथील ते काम करणारे हातांना कोणी प्रेरणा दिली असेल ? कोण त्यांच्या समोर मॉडेल म्हणून उभे असेल ? राजा रवी वर्माला कोणी संमोहित केले ? त्यांच्या मनावर जादू करून त्या हातांमधून कोणी कार्य करवून घेतले ? तिने कि त्यांच्या आत रसरसणाऱ्या सृष्टीने ? एकाच स्त्रीचे शिल्प आणि चित्र काढून ते कलाकार थकले का नाही ? तिच्यामध्ये असे काय वेगळे होते कि त्यांची नजरच वेगळी होती ? का मी सततच तिचेच छायाचित्रे काढतोय ? पण हा प्रश्न पडणारा तो एकटाच नव्हता. त्याच्या आधी हजारो आणि त्याच्या नंतरही हजारो कलाकारांना हाच प्रश्न पडला. हात आणि शरीर बदलले. परंतु निर्मितीची भावना, तो जोश आणि समाधान प्रत्येकाने अनुभवले. अपूर्णतेत कुठेतरी पूर्णत्वाची हलकीशी झलक अनुभवली.
एक दिवस येईल जेव्हा तिच्या सर्वांगावर सुरकुत्या येतील, शरीर मंद होईल. तो देखील थकलेला असेल. डोळे आणि हाताची बोटे तितकीशी साथ देणार नाहीत. आणि हळूच पंचतत्वात मिसळून जातील. परंतु प्रकाश आणि छायेच्या आधारे केलेली निर्मिती मागे उरेल. काही वर्षांनी ती देखील नष्ट होईल. परंतु नष्ट होणार नाही तो उत्साह आणि उमेद. दुसरा कोणीतरी अजून नवनिर्मिती करेल. कोणीतरी नवीन अशी ती त्या नव्या कलाकारास प्रेरित करेल. या शरीराच्या आणि कलानिर्मितीच्या साधनांच्या माध्यमातून वैश्विक चक्राचे गायन करतील.
तो : निसर्गाशी एकरूप होऊन निसर्गाची सखी ती प्रत्येक भागात मला नवीनवी वाटतेय. त्याच त्या ठराविक मुद्रांमध्येदेखील मला काहीतरी नवीन गवसतेय. एक लय सापडते. त्या पाण्याशी, दगडाशी, आकाश आणि झाडांशी ती संवाद साधतेय. हे निसर्गाशी तिचे आणि माझे नाते कितीतरी वर्षांपासून आम्ही विणतोय. तिच्यासारख्या असणाऱ्या स्त्रियांना मी तिच्यात पाहतो. मग ती एकच कशी ? माळरानावर मेंढ्यांच्या मागे मुक्त फिरणाऱ्या उन्हाच्या लाटा झेलून तांबूस झालेल्या बाणेदार धनगर स्त्रीला मी तिच्यात पाहतो. कोकणातील हिरव्यागार बागेत तुळशी वृंदावन समोर प्राजक्ताची फुले वेचणारी युवती असो कि सह्याद्रीतील कड्यावर सूर्यास्त पाहणारी आदिवासी स्त्री असो ह्या सर्व तिच्यातच आहेत. तोच ताठ कणा, ओसंडून वाहणारा उत्साह, मन चेतवणारे भावविभ्रम, भोळेपणा, राकटपण आणि नाजूकता देखील.
एकी मध्ये अनेकींना पाहत त्यांचे प्रतिनिधित्व करण्याचा हा तिचा आणि त्याचा एक प्रयत्न. सध्याच्या जाहिरातीच्या युगातील सौंदर्याच्या मापदंडांपलीकडे जाऊन आसपासच्या जिवंत माणसांमधील सौंदर्य पाहण्याचा एक छायाचित्राचा प्रकल्प. कालीदासांच्या काव्याला छयाचित्राद्वारे अनुभवण्याचा प्रयत्न. गुहा आणि मंदिरांमधील शिल्पामधील भाव प्रत्यक्ष निसर्गात चित्रित करण्याचा एक प्रयत्न. भूतकाळातील कलाकारांची ऊर्जा घेऊन मानवी देह आणि त्यातील पूर्णत्वाचा शोध घेण्याचा हा प्रयत्न.


प्रत्येकाची एक सखी असतेच आणि तिचा देखील एक सखा. संसारापलीकडे देखील दोघांचे एक नाते असते. तो आणि ती प्रत्येकवेळेस एकमेकांना नव्याने पाहतात. ह्या अफाट विश्वात प्रत्येक क्षणी आपण नवे होत असते. तीच जागा, तेच लोक संदर्भ बदलला, अनुभव आणि संवेदना बदलल्या कि वेगळे भासतात. मग एका कलाकाराला तर प्रत्येकवेळेस ती नवीच भासते. शरीराच्या पलीकडे जेव्हा ऊर्जा महत्वाची बनते तेव्हा ती ऊर्जाच कार्यातून प्रवाही होते. शरीर हे फक्त माध्यम होते. कॅनव्हास, दगड, लाकूड, कॅमेरा हे फक्त त्या उर्जेला दाखविणारी आयुधे बनतात. फक्त आपली नजर आणि मन नित्य नूतनच्या शोधात हवे. काव्य आपल्यामध्येच असते.


लेखन आणि छायाचित्रे : योगेश कर्डीले

मॉडेल : रागिणी कर्डीले

सर्व हक्क राखीव.
379 views0 comments

Recent Posts

See All

留言


bottom of page