top of page
  • Writer's pictureRaginee K

नीला | The Blue Goddessढगांच्या मऊसुत दुलईच्या खाली लपलेली सर्पिणीसारखी ती सरिता. सागराच्या ओढीने सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवर खेळत उताराकडे धाव घेते. तिचे दर्शन घेण्यासाठी साक्षात सूर्याला देखील वाट पाहावी लागते अशा घनगर्द वनराईने जिच्यावर सावली धरलीय. आणि या एकांत स्थळी विहार करणारी वनकन्या नीला.तथाकथीत संस्कृतीपासून अस्पर्श. निर्व्याज, मुक्त आणि उत्कट. वेली झाडींचे गुपीत मनाच्या गाभाऱ्यात साठवून ठेवणारी. पशु पक्षांशी हितगुज करणारी. आत्ता इथे पाहिली असे वाटताना धुक्यात लुप्त होऊन मनाला झालेला गोड भास वाटणारी. स्वर्गीय नर्तकाच्या शेपटासारखी घनदाट झाडींमधून सहज तरंगत जाणारी वननर्तकी.समाजाच्या चौकटीत न मावणारी, कधी ओसंडून वाहणारी तर कधी अंधारलेल्या बनात लुप्त होणारी एक वृत्ती. निळ्या आकाशाखाली ते निळ्याशार पाण्यात आपले प्रतिबिंब न्याहाळणारी ती नीला. तुझ्यात देखील तीच दडलीय. आदिम अनंत अशी स्वतंत्र वृत्ती.कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरीही क्षीण न होणारी. निसर्गाने बहाल केलेल्या सर्व भावभावनांनी ओतप्रोत भरलेली. ज्यासाठी या मानवी देहात अवतरली त्या स्वातंत्र्याची चव पुरेपूर चाखणारी ती एक स्त्री. कल्पना, नवनिर्मिती आणि त्याची अभिव्यक्ती यांच्यावरचे बंधन झुगारून देणारी ती आकाश आणि नदीच्या क्षितिजावरच्या संगमावर अवतरणारी.जी तुझ्या हृदयात देखील तेवढीच बेफाम असते जेवढी तुला ती दुसऱ्या उत्कटपणे जगणाऱ्या स्त्रीमध्ये दिसते. फरक इतकाच असतो कि ती स्वातंत्र्याला सर्वोच्च किंमत देते तर तु नाते, समाज, नीतीनियम यांच्या हळुवारपणे बांधल्या जाणाऱ्या पाशात करकचून आवळली जातेस.फक्त एकवार आतल्या त्या आकाशासारख्या मुक्त आणि पाण्यासारख्या प्रवाही नीलेस आवाज देऊन पहा. याची देही, या क्षणी आणि येथेच तु स्वतंत्र, आनंदी आहेस. या जगतास निर्माण करणारी, स्वर्ग आणि संसार या दोन्हींची आधार अशी तू नीला.ज्या वनामध्ये सूर्याच्या किरणांनाही प्रवेश निषिद्ध आहे अशा घनगर्द वनराईत सृजन आणि संहाराचा खेळ अनुभवणारी ती तू. धीरगंभीर अशा वृक्षांच्या तरंगांना अनुभवणारी आणि त्या ध्यानस्थ वातावरणात तल्लीन होत त्या वनाशीच एकरूप झालेली नीला.दिवस मागून दिवस लोटतात. ऊन पावसाचा खेळ वाऱ्याबरोबर चालू राहतो. कधीतरी कोणी चुकून या राईत भटकतो. तुझ्या क्षणिक दर्शनाने एकतर लुब्ध होऊन तुला एकवार पुन्हा पाहण्याची आस घेत सीमेवर घोटाळतो. पण तू मात्र पुन्हा दिसत नाहीस.  


मग सुरु होतो दंतकथांचा खेळ. सुरस , चमत्कारिक आणि भयावह देखील. परंतु तुला अनुभवलेला मात्र शतकांच्याही पलीकडचा काळाच्या पडद्याआड लोटलेला. तू मात्र अगदी तशीच तजेलदार वेलीसारखी नीला. पंचमहाभूतांशी जोडलेली वनराईच्या परिसस्पर्शाने सदैव तरुण असलेली जशी पहिल्या पावसात पालवी फुटलेली वेल. कधी वाटते आपल्याच रूपाचा मोह होऊन स्वतःच्याच प्रेमात पडून तू एकटी तर राहत नाहीस ना ? कि या वनराईने तुला बंदी तर नाहीना बनविले ?  
 का अथांग असे पाणी  आणि आकाशात तरंगणारे धुक्याने तर तुला चकवा नाही ना लागला ? काय असेल ज्यामुळे तु या अशा निर्जन स्थळी आहेस ? अंगाचा थरकाप उडविणारे उंच वृक्ष, भर दिवसा येणारे वन्य श्वापदांचे आवाज आणि वाळलेल्या पाचोळ्यावरही येणाऱ्या आवाजामुळे वाटणारी भीती. का ?  


मग विचार येतो का म्हणून तू या आमच्या जगात येशील ? वार्धक्य, संघर्ष आणि फसवणूक अशा या कोलाहल असणाऱ्या विश्वात राहण्यापेक्षा एकटे राहणेच श्रेयस्कर. कधीतरी एकदा तुला भेटल. अगदीच काही नाही तर किनाऱ्यावरून पैलतीरी असलेल्या तुला पाहिल. या वनराईचे मानवी स्वरूपात फुललेले फुल नक्की कसे दिसते ते याची देही याची डोळा अनुभवीन. 

All rights reserved.

Photography & words : Yogesh Kardile

Muse : K Raginee Yogesh


116 views0 comments

Comments


bottom of page