top of page
  • Writer's pictureRaginee K

बलात्कार आणि … शेपूट घातलेला समाज



ज्या देशात मंदिरांवरची काम शिल्पे पाहताना लोकांचे हात जोडले जातात. त्याच देशात तिच्या कपड्यांच्या चॉइसने म्हणे बलात्कार वाढतात. हे कुठले लॉजिक ? पडद्याआड / बुरख्याआडची महिला देखील येथे सुरक्षित नसते हे काय सुचविते ? घरातले बाप्ये मात्र बनियानच्या मधून पण बाहेर ओघळत असतात. कोणाची तर चड्डी देखील खाली घसरत असते. पण तिचा पदर मात्र घसरला नाही पाहिजे. यांचे अंगविक्षेपाने मात्र संस्कृती नासत नाही. मुलींनी नाही कधी रेप केले. त्यांना वासना नसते का? मग तुम्हालाच असे काय होते की मुलींच्या कपड्याने तुमच्यातला राक्षस जागा होतो ?

खरे सांगू का याची सुरवात घरातूनच होते. कोणी काका, मामा चॉकलेटच्या नावाखाली तिच्या गालाचा पापा थोडा जास्त घेतात. नको ते चाळे करतात. आईला सांगितले तर ती म्हणते सोडून दे बाबांना नको सांगू म्हणते. मग मोठी झाल्यावर तिच्या मागे मुले लागतात. तर तिचा लाडका भाऊ तिचाच द्वेष करतो. त्याला मित्रांमध्ये बहिणीचा विषय निघाला कि तिथून निघू वाटते. आणि दरवर्षी तिला मात्र त्याला राखी पाठवावी लागते. बाप तिला शहरात कॉलेजला जाणे नाकारतो. जणू काही तीच दोषी आहे. लग्नांनंतर गर्दीत परपुरुषाचा धक्का लागला तर नवरा तिलाच नीट चालण्याचा सल्ला देतो. आणि गर्दीत जाण्याऐवजी घरीच बस म्हणतो. कधीतरी नवऱ्याच्या अनुपस्थित दीर हलकेच खडा टाकून कामाच्या नावाने तिला नकोस स्पर्श करतो. तर कधी नात्यातली तथाकथीत मोठी माणसे आशीर्वादाच्या नावाने डोळेभरून तिला न्याहाळून आणि पाठीवर हात फिरवून घेतात.


              अरे तुमची संस्कृती एवढी महान आहे तर का एवढ्या साऱ्या बायकांना मरावे लागले ? नदीत गायब झाली, डोंगरावर गुप्त झाली. राक्षस मागे लागला. किती बायांना मारून तुम्ही देवी करणार आणि त्यांच्या जीवावर कमविणार? का नाही असेच मग देव तयार झाले ? तर दुसरे तिला नखशिखांत काळ्या कापडात गुंडाळून तिचे स्त्रीत्व झाकून तिचे पावित्र्य टिकवितात. उन्हातान्हात उकडून तिचे आत काय होत असेल हे तिलाच माहित. डोंबल्याची समानता तुमची ? त्या मेणबत्त्या, ते मोर्चे आणि माझ्यासारखे अनेक उमाळे फुटलेले लेख आणि ट्विट येतील आणि जातील. पण आपल्या घरातून तुम्ही सुरुवात करणार आहात का ?


तुमच्या मुलासारखे तुमच्या मुलीला, सुनेला, बहिणीला, नातीला वागवलं का ? नाही. मला माहित आहे. तुमची संस्कृती तिला झाकून आणि पायात परंपरा नावाचा दगड ठेवू पाहते. १००० वर्षांपूर्वी आलेले आक्रमक तुमचे बाप नाहीयेत. ते गेले पण त्यांची ती भीती तुमच्यात अजूनही संस्कार म्हणून परिवर्तित झालीय.आपले संस्कार तिला झाकून ठेवण्याचे नसून एक व्यक्ती म्हणून मुक्तपणाने जगण्याचे आहे हे खजुराहो, बेलूर, हळेबिडू, मीनाक्षी अम्मन, कामाख्या शक्तीपीठ, गाथा सप्तशती यातून ओरडून सांगताहेत. शंकराचार्यांनी आपल्याला हरविले तरच नवऱ्याला देखील हरविले म्हणून त्याच्या ( मंडनमिश्र ) बाजूने शास्त्रार्थ करणाऱ्या उभय भारती कोण हे तुमच्या गावीही नसते. पण वाचायला आणि डोळे उघडून पाहायला वेळ कोणाला आहे ? उदाहरणाच्या नावाखाली बलात्कारी दुर्योधन, दुःशासन आणि षंढपणे गप्प बसलेल्या कर्णाचे उद्दात्तीकरण करताना हसत हसत महाभारताचे कारण म्हणून द्रौपदीवर बोट ठेवणारे षंढच बलात्काराला खतपाणी घालतात. सतीसाठी सगळे राख करणारा भगवान शंकर तुम्ही विसरला. १६१०८ स्त्रियांची अब्रू वाचवून त्यांना आपले नाव लावणारा कृष्ण तुम्ही विसरला. रासलीलेच्या नावाखाली वर्णने करीत आंबट शौकीन आपली हौस तिथे देखील भागवून घेतात.


           आत्ताआत्तापर्यंत शास्त्र आणि शस्त्र चालविणाऱ्या स्त्री आणि पुरुषांचा हा देश होता याचा आपल्याला कदाचित मानसिक गुलामगिरी जिला आपण संस्कार म्हणतो त्यामुळे विसर पडलाय. पुढची पिढी जिच्या पोटात वाढणार तिच्याविषयीचा आदर किंवा दृष्टिकोन तुमच्या भेदभावातूनच प्रतीत होतो. ती शिकलेली मुलगी तुम्हाला सोबत यावयाला सांगत नाही. ती बिचारी एकटीच संघर्ष करीत पुढे जाते. पण तुमचा नकार मात्र तिला सारखा मागे मागे खेचीत असतो. तुमची ती नजर, ते बोचरे शब्द, ती तुलना तुमच्या पुरुषत्वाचा कमी पण षंढत्वाचा पुरावा जास्त देते. मग ती कितीही दमून भागून घरी येवो चहा आणि जेवण तीच करणार. तुमचा लाडोबा सोफ्यात रुतून बसणार. घरात मोलकरीण असली तरीही तिच्या हातची चवच न्यारी असे म्हणून तिचा जीव रोजच घेणार. आणि हे सगळे तुमची मुले, त्यांची मुले आणि त्यांची पुढची पिढी देखील पाहणार. हेच टीव्ही आणि चित्रपटांमधून देखील हळूच आडून आडून सुचविले जाणार. तर घरातील जाणत्या ( तथाकथित ) बाया मात्र सासू, सून, नवऱ्याची पहिली, दुसरी, तिसरी बायको आणि त्यांची लफडी अशा अनेक मालिकांचे दळण दळीत बसणार. काय तुम्ही देश सुधारविणार ?


 आपल्याच घरातून तुम्ही सुधारणा करणार का ? आपल्या मुलीचा, बहिणीचा, पत्नीचा आणि सुनेचा आधार बनणार का ? बाहेरचे आपोआपच सगळे ठीक होईल. फक्त तुम्ही बदलणार का ?


Muse : K Raginee Yogesh

Writeup & Photography : Yogesh Kardile

All rights reserved.


28 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page