top of page
  • Writer's pictureRaginee K

महाराष्ट्राची शक्ती



रखरखत्या उन्हात, काळ्या पाषाणाच्या देशात, राकट माणसांच्या समूहात एक फुल फुलते. तिखट आणि फटकळ स्वभावाच्या आड दडलेली ती सौंदर्यलतिका आपले अस्तित्व लपवीत प्रत्येक दिवस कडेला लावते. सकाळची पूजा, अंगण सारवणे, गुराढोरांची सेवा करीत दिवस कधी उजाडतो तेच कळत नाही. कपाळावरून हात फिरवून तोंडावर पाण्याचा शिपका मारीत ती पुन्हा जात्यावर बसते. साखरझोपेत असलेले लेकरू मांडीवर घेऊन ओव्या गाते. भाकऱ्यांचा ढीग हळूहळू टोपल्यात तयार होतो आणि घर धनी भाकऱ्या दोनचार मोडून मग शेतावर जातो.




हिची उरलेली कामे सुरूच असतात. दुपारचा थोडासा विसावा आणि परत संध्याकाळची लेकरे, त्यांचा बाप आणि जित्राब घरला परत येतात. शरीराचा थकवा चेहऱ्यावरच्या आनंदाने कुठेतरी पळून जातो. मग संध्याकाळची दिवाबत्ती होते. जेवणे उरकतात मग सगळ्यांच्या मागे त्याच्याशी गुजगोष्टी करून घोंगडीवर पाठ टेकविते. अशी या महाराष्ट्रातील कोणाची माय, लेक, तायडी किंवा बायको आजही कुठे ना कुठे घरासाठी कोनाड्यातल्या पणती सारखी तेवत असते. तिच्या शांततेत एक संगीत असते, नजरेत प्रेमाचा ओलावा, तर लटक्या रागात प्रेम असते. विना चेहऱ्याची, विना तक्रार ती एक स्त्री या समाजाला घडवीत असते. डोंगरच्या आणि काळ्या मातीच्या लांबच लांब पसरलेल्या या राज्याची माय आजही जागीच असते. शक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोण तर तुमच्या आमच्यातल्या राकट माणसाला प्रेमळ आणि सुसंस्कृत बनविणारी तीच असते.




Photography & words : Yogesh Kardile

Muse : K Raginee Yogesh

All rights reserved.

67 views0 comments

Comments


bottom of page