वेरूळ येथील कैलास मंदिर पाहिल्यावर मनात पहिला प्रश्न येतो कि त्याकाळातील लोक कसे असतील. कलेसाठी आयुष्य समर्पित करणारे लोक कसे असतील ? त्यांची ती आयुधे, चित्रे, शिल्पांसाठीचे मॉडेल्स आणि दिवस रात्र चाललेली कामे. राजे आणी व्यापारी यांच्या देणग्या, येणारे जाणारे लोक आणि साधुजन.
आज जसे राममंदिर बनविण्यासाठी सर्व देशातील समाज एकत्र आलाय, शिळा एका ठिकाणाहून, कलाकार दुसरीकडून, लाकडे दुर्गम जंगलातून ; सर्वजण भारावलेल्याप्रमाणे जोडले गेलेत. हे मंदिर तर १२०० वर्षांपूर्वी जवळपास १०० वर्ष निर्माणाधीन होते. साधारणपणे कलाकारांच्या तीन पिढ्या येथे गेल्या असतील आणि मंदिराचे स्वप्न पाहणारे राजा आणि राणी तर केव्हाचेच. पुढच्या पिढीने तेवढ्याच तत्परतेने ते चालू ठेवले असेल.
कोणी दक्षिण तर कोणी उत्तर भारतातून आले असेल. मानवी सौंदर्याची परिसीमाच येथे झाली. ग्रीक आणि रोमन वास्तववादी शिल्पांच्या पलीकडे येथील शिल्पांच्या डोळ्यातील भाव आणि अंगातील लय पकडण्याचे काम करणारे शिल्पी कलायोगीच असणार. एकाच क्षणात भौतिक आणि अधिभौतिक जगाशी जोडणारे शिल्प आपल्याला त्यांच्या विश्वात घेऊन जातात. अर्धोन्मीलित नेत्र, तालबद्ध पदन्यास, उन्माद, विलास, सौंदर्य सारे काही त्या जागी जिवंत होते.
सूर्याला थोडीशी जागा आत उतरण्यास दिलेल्या या भूमीत एक वेगळाच अनुभव वावरताना येतो. कदाचित तसा अनुभव पिरॅमिड्स मध्ये असेल. परंतु येथे जीवनाचा सुगंध तुटलेल्या मूर्तींमधून अजूनही दरवळतोय. राजांच्या अट्टहासापायी मारली गेलेली स्वप्ने येथे नाहीत. तर पुढच्या पिढीसाठी निर्मिलेली स्वप्ने आहेत. कोणी येथे देव दर्शनासाठी येत असेल , तर कोणी प्रिय व्यक्तींना भेटण्यासाठी तर एखादा ध्यानात डुंबण्यासाठी. प्रत्येकाचा स्वार्थ वेगळा पण जागा मात्र एकमेवाद्वितीय. दंतिदुर्ग ( राष्ट्रकूट घराणे ) राजाच्या राणीने पाहिलेले स्वप्न खरे करण्यासाठी उभारलेले हे मंदिर आणि गुहा आज कदाचित दंतकथा वाटत असेल. पण ती नक्कीच एक सर्वश्रेष्ठ प्रेमकथा आहे. हट्ट करावा तर असा आणि प्रेमासाठी नवनिर्मिती करावी तर समाजासाठी लाभदायक हा बोध नक्कीच त्या कथेतून मिळतो.
कालातीत कला निर्माण करण्यास कोणती साधना त्या कलाकारांनी केली असेल. आजचे प्रसिद्ध गाणे, सिनेमा किंवा एखादी कलाकृती लोकांच्या स्मृतीतून जाऊन काळाच्या उदरात गडप चटकन होत असताना १२०० वर्षे आजही आपले मन आणि बुद्धी हे कार्य पाहिल्यावर स्तिमित होते. नक्कीच कुठल्याही शैली पेक्षाही नवरसांच्या प्रत्येक भावनेने ओथंबून भरलेले काम करणारे हात आणि त्यामागचे मन ध्यानस्थ योग्याचे असणार.
इतक्या उत्कृष्ट कार्यामागे अर्थशक्ती व राजशक्ती उभी करणाऱ्या लोकांचे कौतुक करावे तेवढे थोडे. जेवढे महान कलाकार महत्वाचे तेवढेच त्या कलाकारांची कदर असणारे राजे आणि व्यापारी. आजच्या काळात न समजणाऱ्या कले वर अमाप पैसे खर्च करणारे व्यापारी किंवा संघटना पाहिल्यावर एक जाणवते कि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला कलेचा आनंद घेता यावयाला पाहिजे हा विचार करणारा राजा कले प्रती किती संवेदनशील असेल !
सुसंस्कृत समाजाच्या व्याख्या प्रत्येक ठिकाणी आणि कालगणिक बदलत असतात. परंतु जेथे समाजातील सर्व स्थरांना मुक्तपणे व्यक्त होता येते , राजा समाजाभिमुख कार्य करतो आणि समाजासाठी काहीतरी मागे ठेवून जातो तो समाज इतिहासात आदराने ओळखला जातो. जगभरात गुलामांच्या पिळवणुकीच्या अनेक कथा असताना भारतातील स्थापत्य ही राजांनी समाजाला अर्पण केलेली आढळतात. स्वतःचे नाव मोठे करण्याऐवजी अनेक पिढ्या त्यावर कार्य करीत मागे ठेवून जातात ; एक आदर्श समाज कसा असावा याचा वस्तुपाठ.
अनक्षर समाजाला शिल्पांच्या आणि चित्रांच्या मध्यमातून आयुष्याचे शिक्षण दिले जाते. सगुण साकार रूपातील सौंदर्य, विलास, युद्ध यांच्या गोष्टींद्वारे एक संदेश गुंफिला जातो. शब्दातीत संपर्काचे अतिशय उत्तम माध्यम या दगडांद्वारे आपल्यापर्यंत पोहचविले जाते. तर हळू हळू अंधारलेल्या गाभाऱ्यात त्या निर्गुणाची परिचय करवून दिला जातो. तर गुंफांमध्ये स्वतःवर नियंत्रण मिळविण्यासाठी ध्यान आणि इतर विधीचे प्रशिक्षण. ज्याला जे हवे त्याच्यासाठी ते सर्वच येथे उपलब्ध.
ज्याचा जसा अधिकार, वय आणि समाजातील जबाबदाऱ्या त्या सर्वांसाठी एक केंद्र म्हणजे हि मंदिरे आणि गुफा. व्यापारी, राजे राजवाडे, साधू, भिक्खू, जैन उपासक आणि स्त्री, पुरुषांसाठी हा सोहोळा कायमच उपलब्ध. वेरूळच्या जंगलात, जलप्रपातांच्या सान्निध्यात हे आश्चर्य उभा करणारा राजा एकाच वेळी सांसारिक प्रेम आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टींत श्रेष्ठ झाला. आज कोणीही राजाला ओळखत नाही ना त्याची गोष्ट रंगवून सांगितली जाते. पण आज ते कार्य पाहून मन स्तिमित होते.
हो अनेक मुर्त्या धर्मद्वेष्ट्यांनी तोडल्या. तश्या त्या जगभरच तोडण्याचे सत्र अनेक शतके चालूच होते. तरीही हे महान कार्य मागे उरलेच. भगवंत जरी निर्गुण निराकार असला. आपल्या विचारांच्या कवेत न मावणारा असला तरीही तो जळी, स्थळी , काष्ठी आणि पाषाणी तितकाच उपलब्ध आहे जितका तो आपल्या हृदयात. त्यामुळे तो या पाषाणांमध्येही तेवढाच आहे. प्रश्न असतो भावनेचा आणि संवेदनशीलतेचा. ती हे कार्य निर्माण करणाऱ्यांच्या, त्यांना आश्रय देणाऱ्यांच्या आणी समाजाच्या मनात त्यावेळी होती जी आज पुन्हा जागी करण्याची गरज आहे.
लेख आणि छायाचित्रे : योगेश कर्डीले
मॉडेल : रागिणी कर्डीले
सर्व हक्क राखीव
Comments