दुपारच्या उन्हाचे चटके जरा कुठे सुसह्य होताहेत तो संध्याकाळ मंद वाऱ्यासोबत पठारावर पाझरू लागते. सूर्य मावळतीला कलतो आणि आकाशात रंग उधळले जातात. गवतावर मेंढ्यांची लगबग सुरु होते. धुळीचे लोट हवेत उडवीत ती परतीला निघतात.
दूरवर असणाऱ्या टेकडीवरच्या छोट्याश्या मंदिरात दिवा लागतो. कातरवेळ म्हणतात ती हीच नाही का ? आयुष्यातला उत्साह संपलेला नाही. पण थोडा थकवा मात्र आलाय. घराची आठवण होतीय. कारण कोणीतरी आपली वाट पाहतेय. मन हळूच भूतकाळात डोकावते.
पारावरची म्हातारी मंडळी आता देवळात भजनासाठी गेली. पक्षी देखील क्षितिजा पलीकडच्या घरी भुर्रकन उडून गेले. चुली नुकत्याच पेटल्यात आणि मुले शेकोटीपाशी एकवटलीयेत. आजीच्या पदराआड कोणीतरी दडून गोष्ट ऐकतेय तर कोणी आईला स्वयंपाकात मदत करतेय. अनादी काळापासून मानवजात तिच्या आगमनाची चाहूल लागल्यावर आपल्या हालचाली मंद करीत घरट्यात एकवटतात.
पण तिचे नृत्य आता कुठे सुरु झालेय. हळू हळू प्रकाशाची दुनिया ती आपल्या काळ्याशार पदराआड झाकून टाकणार. माहित आहे उद्या तिला जावे लागणार. तरीही ती नेहमीप्रमाणे आपले नृत्य करीत सर्वदूर वितळत ज्ञात आणि अज्ञात यातला फरक संपवून टाकणार. या जगातील माझी त्या जगातील दुनियेशी जोडणारा एक धागा म्हणजेच ती कृष्णा. निद्रिस्त अवस्थेत विश्व संचार घडविणारी. काल निद्रेतून खेचून जागृतीचा अनुभव देणारी भैरवी.
ज्याच्या साक्षात्काराने आपले अस्तित्व आहे असा हा प्रकाशदेखील तिच्या अनंत कृष्णवर्णी पदरावरील एक छोटीशी नक्षी होय. जो विश्व संचार करीत शेवटी थकून तिच्या मध्येच पुन्हा एकदा विरून जातो. छोट्याश्या पणती पासून ते अतिविशाल आकाशगंगेला देखील उरात सामावून घेणारी रात्र. जेथे काळाचे अस्तित्व देखील गडप होते अशी ती शक्ती.
जिचा संचार हा सृष्टीत प्राण फुंकतो आणि वेळ आल्यावर तो परत देखील घेऊन जाते.
शब्द आणि छायाचित्रे : योगेश कर्डीले
मॉडेल : रागिणी कर्डीले
साडी : इरकल नऊवारी ( रखुमाई )
ठिकाण : पारनेर ( नगर जिल्हा )
Comments