top of page
  • Writer's pictureRaginee K

संस्कृती आणि स्वातंत्र्य



खानपान, संगीत, कला, वस्त्रालंकार, स्थापत्य, धर्म यासारख्या गोष्टीं पाहून / अभ्यासून थोडाबहुत आपणास तेथील समाजाचा अंदाज येतो. यांचे पूर्वज कसे होते. त्यांची अभिरुची, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि जीवनशैली कशी होती. त्यांच्या राज्यकर्त्यांची समज आणि गुणग्राहकता कशी होती याचे प्रतिबिंब ठळकपणे दिसते.



वर्तमानाच्या चष्म्यातून पाहताना भूतकाळ कदाचित खूप तेजस्वी किवां मागासलेला वाटू शकतो. परंतु कुठल्याही समाजाच्या सर्वोच्च प्रगतीचे चिन्ह हे त्याच्या स्थापत्य, संगीत आणि साहित्यामधून डोकावते. संस्कृती निर्मितीसाठी स्वातंत्र्य ही पहिली गरज असते. हे स्वातंत्र्य पहिल्यांदा विचारांचे, त्यांना व्यक्त करण्याचे आणि मग नवनिर्मिती करण्यासाठी गरजेचे असते. मुक्त विचार करणाऱ्यांची कदर करणारा शासक, उन्नत व्यापारी वर्ग आणि कष्टकरी समाजच वैभवशाली संस्कृती घडवितो.



तर मानसिक पारतंत्र्यात आणि शारीरिक मरगळ आलेला समाज गुलामांची संस्कृतीस निमित्तमात्र ठरतो. आजची सामाजिक स्थिती आणि विचारांचे स्वातंत्र्य हेच उद्याचा इतिहास घडविणार आणि पुढची पिढी अर्थातच त्यालाच आपली संस्कृती म्हणणार. त्यांना त्याचा अभिमान वाटेल कि नाही हे आपल्या कार्यावरून ठरेल हे मात्र नक्कीच.



परकीयांच्या ओंजळीतून पाणी पिणार्यांना प्रत्येक गोष्टीत उणेच दिसणार. परंतु आपल्या स्वप्नातील संस्कृती घडवायची असेल तर स्वप्नातला विचार धोका पत्करून सत्यात उतरवायला हवा. नकारात्मक बोलणारे ; जरी ते रक्ताच्या नात्याने, मैत्रीच्या धाग्याने बांधलेले, कार्यालयातील सहकारी किवां छुपे विरोधक असतील तरी त्यांच्या नकारात्मकतेने प्रभावित न होता पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी काम आपापल्या क्षेत्रात करावे. संस्कृती म्हणजेच आयुष्याच्या धडपडीत कामाच्या रूपात निर्मिलेला आणि मनाला गवसलेला आनंद. ज्याचा सुवास अनेक पिढ्यांपर्यंत दरवळत राहील. आपले शरीर, घर आणि सर्व भौतिक गोष्टी या कालांतराने संपतील.



मागे उरतील ते कार्य, कलाकृती आणि विचार. कारण आपण आहोत सह्याद्रीच्या लाव्ह्याच्या डोंगराला वरतून खालपर्यंत फोडून, तासून हिमालयातील शिवशंकराचा कैलास मंदिररुपाने महाराष्ट्रात अवतारण्याचे कार्य करणाऱ्या महाराष्ट्रीयांचे वंशज. भारतीय स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेछ्या. जय हिंद जय महाराष्ट्र ।


All rights reserved.

Muse : K Raginee Yogesh

Photo & words : Yogesh Kardile


40 views0 comments

Comments


bottom of page