top of page

उत्सव चैतन्याचा

  • Writer: Raginee K
    Raginee K
  • 5 days ago
  • 3 min read

अनादी काळापासून या धरणीवरती वारा आपल्या मस्तीत वाहतोय. कधी तुफान तर कधी वावटळ कधी सोसाट्याने तर कधी गुंजारव करीत. तुम्ही कधी त्याला बदलू शकता का किंवा तसा प्रयत्न केला का ? तुम्ही कधी त्याला दोष दिला तर कधी त्याच्या शीतलतेने प्रेमात पडले पण तो मात्र तसाच वाहतोय. समुद्राच्या लाटांना हाकारीत, गवताळ कुरणावरून लहान मुलासारखा नक्षी बनवीत तर रानावनात जोरजोरात शिट्ट्या मारीत. फारतर आपण पवनचक्कीने त्याची ऊर्जा स्वतःसाठी वापरू शकतो किंवा बासरीतून सुंदर संगीत निर्माण करू शकतो. परंतु त्याच्या असण्याला थांबवू शकत नाही.

मग जी कला निसर्गातून उत्कटतेने स्फुरते तिला एका साच्यात बांधण्याचा हट्ट का करतो ? अभिव्यक्तीतील वैविध्य, उत्कटता, प्रेम, आतुरता काळानुसार व्यक्त होताना ते समजून त्यातला आस्वाद घेण्यास का कमी पडतो हा विचार कधी कधी मनात येतो ? प्रत्येक काळानुसार कला बदलत गेली, नाट्य, चित्र, शिल्प, संगीत, वस्त्र सारे काही स्थित्यंतरातून गेले. परंतु कलेला प्रत्येक काळात परीक्षा द्यावी लागली कारण कलेचे आश्रयदाते कधी शिक्षित होते कधी नव्हते. जेव्हा ते शिक्षित आणि उदार होते तेव्हा कला उच्च शिखरावर पोहोचली. जेव्हा आक्रमक आले तेव्हा त्यांनी आपल्या धर्माची, भूभागाच्या आपापल्या समजुतीनुसार तिला बंधनात बांधण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानुसार समाजाची अभिरुची घडत बिघडत गेली.


परंतु कला हि तर वाऱ्यासारखीच मुक्त होती आणि राहील. निसर्गाशी प्रत्यक्ष संपर्क असणारे दोनच व्यक्ती एक कलाकार आणि दुसरे योगी. एकाने भोगातून निसर्गाला ओळखले दुसऱ्याने सर्व त्यागून सर्व काही मिळविले. दोघेही उत्सव करीत निसर्गात विरून गेले आणि मागे राहिले ते त्यांचे शब्द आणि कलाकृती. मोजूनमापून व्यक्त होतो तो समाजात मान्यता प्राप्त करून संपत्तीसाठी धडपडणारा. कलेला घेणे फक्त आणि फक्त आनंदाचे. नवरस आणि स्वानंद हेच ते काय खरे तिचे मानक.

प्रत्येक युगातली आनंदाची भाषा, माध्यमे आगळी वेगळी होती आणि पुढेही वेगळे राहतील. भूतकाळाच्या मानकांवर अडून बसलेले लोक नदीच्या काठावरच्या पाषाणासारखे. ना त्यांना तिच्या खोलीचा अंदाज ना शीतलतेचा स्पर्श. हो कधीतरी तिच्या रौद्र रूपाचा स्पर्श पुराच्या माध्यमातून आयुष्यात होणार नाहीतर आयुष्य काठावरतीच जाणार.


मोहेंजोदडोच्या नर्तकीचा बाज हा त्या काळातील कलाकाराचा उत्कट अविष्कार तसेच बेलूरच्या सौंदर्यलतिकांचे विभ्रम तेवढेच अनोखे, खजुराहोतील प्रेमी स्त्रीचे समर्पण तेवढेच नेत्रदीपक व रानातल्या राकट स्त्रीचे निसर्गातील नर्तन तेवढेच थक्क करून टाकणारे. भाव आणि त्याचे प्रकटीकरण स्थळ काळानुसार बदलत गेले परंतु आतला उमाळा मात्र अगदी तसाच जसा धरणीच्या आतला ज्वालामुखी आणि डोंगरावरून पडणारा एखादा धबधबा. कधी स्फोटक तर कधी संथ ; खोल डोहाचे रूप धारण करणारा. त्या पंचमहाभूतांना सामावून घेणारा हा देह त्यांच्याच तालावर हलणारा. जसे चंद्राच्या जवळीकीने उधाणलेला समुद्र तर सूर्याच्या आगमनाने फुलणारे कमल, पावसाच्या आगमनाने वेडा होणार चातक तर वसंतात प्रखर उन्हात रसरसून उमलणारी रानफुले. आयुष्य म्हणजे उत्सव आणि पुढचे मागचे काही राखून न ठेवता आपल्याकडचे आहे नाही ते उधळून देणारा हा निसर्ग. मग आपण तरी का हातचे राखून जगावे ?

लहान मुलांसारखे समुद्राच्या किनाऱ्यावरती आपल्या मनातील चित्र रेखाटून जावे. रात्री भरतीच्या लाटा येऊन नव्याने किनारा त्याला पुन्हा कोरा करकरीत करतील आणि पुन्हा नवीन चित्रकार येईल. तितक्याच उत्साहाने तो रेतीत रेखाटील. निसर्गाच्या उत्कट उत्सवात आपापल्या पद्धतीने आपला एक छोटासा उत्सव.


To access the complete photo project subscribe to www.patreon.com/raginee


Muse : K Raginee Yogesh

Words & Images : Yogesh Kardile

By accessing this content, you agree to not download, screenshot, redistribute, repost, alter, illustrate, paint, trace, use as reference, manipulate, or share it in any form publicly or privately without my prior, written permission.

This includes:

  • No AI training or replication

  • No use in mood boards, NFTs, edits, or fan art

  • No sharing via messaging apps or forums

  • No re-uploads on social media or other platforms

  • No sketches, derivative illustrations, or studies based on this work

This space is sacred. Violations will lead to an immediate ban and legal action if needed. Thank you for respecting the spirit and sanctity of this intimate creative space. 🙏🏽


Comments


bottom of page