top of page

कला, संस्कृती आणि स्त्रीरूप यावर एक चिंतन

  • Writer: Raginee K
    Raginee K
  • Sep 2
  • 6 min read

Updated: Sep 6

ree

‘बोल्ड’ म्हणजे काय?


“तू एवढं बोल्ड काम का करतेस?”असे फोटो टाकल्याने लोक,  नातेवाईक तुला काय म्हणतील ? असं कित्येकदा ऐकावं लागतं. कुणाला मी प्रेरणा वाटते, कुणाला निर्लज्ज. ज्यांना कला समजते असे रसिक, कलाकार आणि कलंदर लोक जोडले जातात तर बरेच लोक मात्र शांतपणे कुंपणावरून पाहत असतात. आमच्यासाठी मात्र ही छायाचित्रं “फक्त फोटो” नसतात. त्यांच्या मागे असते महिनोन्‌ महिने केलेले  वाचन-लेखन, मार्केटमध्ये जाऊन केलेला कपड्यांचा शोध, मन मोडून केलेले डिझायनिंग, स्टायलिंग, पहाटेच उठून केलेले ट्रेक, सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पाडण्याआधीच शूटिंगची केलेली तयारी आणि रात्ररात्र जागून केलेले एडिटिंग. प्रत्येक कामामागे कुठेतरी इतिहास, लोककथा  किंवा दंतकथेतील नायिका असते. हे फोटो  फक्त छायाचित्र नसून आपल्या संस्कृतीतील नायिका, त्यांची प्रेरणा, मूल्ये, सौंदर्य, निसर्ग, शिल्पकलेतील मुद्रा अशा अनेक गोष्टी एकत्र घेतलेल्या असतात. डोळ्यांना सुखावणाऱ्या परंतु त्याही पलीकडे स्त्रीत्त्वाचे सौंदर्य व स्थिरता दर्शविणाऱ्या. मग जेव्हा कोणी म्हणतं “हे अश्लील आहे,” तेव्हा माझा प्रश्न असतो  खरंच कला त्रासदायक आहे का, की तुमच्या मनातलं तुमच्यावर कोणीतरी टाकलेलं ओझं ? वरवरचे पाहणारा मग तो अनोळखी व्यक्ती , जवळची मैत्रीण किंवा मैत्र असो त्यांना फक्त शरीर दिसते. तेव्हा विचारू वाटते तुम्हाला त्याच्यातील लय, डोळ्यातील भाव, कपड्याची लय आणि निसर्गासोबतचे संबंध या वैश्विक गोष्टी दिसतच नाही का ?देहाच्या माध्यमातून देहापलिकडचे अमूर्त असे का नाही गवसत ?


भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात सांगितलं आहे:“जिथे डोळे जातात; तिथे मन जातं; जिथे मन जातं, तिथेच भावना (रस) निर्मिती होते.”




ree

संस्कृती हरवलेली आणि साठवलेली


प्रत्येक युग आपला आत्मा त्या त्या काळातील कलाद्वारे व्यक्त करते. आपल्या पूर्वजांना सौंदर्य, कामवासना किंवा शरीराची लाज वाटत नव्हती. त्यांनी त्याचा उत्सव केला. कालिदासाच्या मेघदूतात असो, गाथा सप्तशती, शृंगार शतक, मालतीमाधव, गीतगोविंद, कामसूत्र यासारखी उत्तम पुस्तके, कविता तर  खजुराहो, बेलूर, हळेबिडू, हंपी सारख्या हजारो मंदिरांच्या शिल्पांमध्ये शृंगाराचे चित्रण उदात्ततेने कोरले गेले. नायिका, गणिका, देवदासी, नर्तकी यांना जो सन्मान तेव्हा होता असे आपण म्हणतो तो आज आपण का हरवला ? चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांची परंपरा असणारा हा देश असताना काम हा कधीच पाप नव्हता तर तो पुरुषार्थाचा एक भाग असून त्याचा उत्सव केला गेला होता. सृष्टीची अखंडित परंपरा चालू ठेवण्यासाठी तो शास्त्रांतून आणि कलेद्वारे साजरा केला गेला. 


योगिनी, यक्षिणी, सुरसुंदरी, लज्जागौरी, सप्तमातृका, अप्सरा इत्यादी  या मुक्त, आत्मविश्वासाने उभ्या राहिलेल्या जीवनाच्या सर्व अंगांचा भोग घेत असताना आजही मंदिरांवर जेव्हा दिसतात तेव्हा आपण त्यात सौंदर्य, परंपरा, मातृत्व, प्रेम आणि काम असे अनेक अंग त्या त्या मूर्तीच्या अनुषंगाने पाहतो. प्रत्येक ठिकाणी अश्लीलता पाहणारी नजर मात्र दुर्दैवाने कला शिक्षित नसते. त्या नजरेला तयार केले असते अशिक्षित परकीय आक्रमकांची मुल्ये स्वीकारलेल्या कुटुंब आणि समाजाने.  त्यांच्या अपराधगंडाला आपण “आपली परंपरा” समजतो आणि त्याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवर होतो. 


आज एखादा पुरुष बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन मध्ये किंवा इंस्टाग्राम रिल्स मध्ये पिळदार स्नायू दाखवतो, तर त्याला वाह-वाह मिळते. पण स्त्री आपले सुंदर शरीर कलात्मकरित्या वापरून एखादी गोष्ट सांगते तर समाज तिला  “निर्लज्ज” म्हणतो. अशी वेगळी ट्रीटमेंट का ?  शक्ती ही पुरुष आणि स्त्री या दोन्हींमध्ये वेगवेगळ्या रूपाने प्रवाहित होत असते. एक निर्मितीक्षम आणि लयदार तर दुसरी रक्षण आणि विनाश करणारी. आणि या दोन्ही गोष्टींचे अतिशय सुरेख चित्रण शब्द, दगड, लाकूड आणि कागदावर आपल्या पूर्वजांनी प्रत्येक शतकांमध्ये वेगवेगळ्या शैलीत केले. ज्याची दाखल सर्व जगाने वेळोवेळी घेतली. फ्रिथजॉफ शुआन म्हणतो: “शरीर म्हणजेच आत्म्याचं रूप, आणि आत्म्याचं खरं स्वरूप.” शरीर नाकारणं म्हणजे पवित्रताच नाकारणं.



ree

खरी अश्लीलता कुठे?


आपल्याला समाजात वावरताना अनेकवेळा लोक रस्त्यावर अंग उघडं करून फिरताना, उघड्यावर लघुशंका करताना, स्त्रियांना छळताना दिसतात  याला आपण “ चलता है “  आहे  म्हणून आपण दुर्लक्ष करतो. पण एक स्त्री, जी कला निर्माण करते, तेव्हा आपण तिला “अश्लील” म्हणतो. मग प्रश्न पडतो कि एखाद्या व्यक्तीने स्वयंप्रेरणे कला निर्मिती करूच नये का ? कि फक्त तत्कालीन समाजमान्यतेनुसारच काम करावे आणि आपला उदरनिर्वाह करावा ? मग पैसे देणारे जर कलेच्या दृष्टीने अशिक्षित असतील तर ? कलेच्या नावावर बिभित्स काम समाजाला चालते. स्त्रियांना नाचवण्यात पुरुषार्थ वाटतो. परंतु जाणीवपूर्वक शृंगारावर कार्य केले तर ते मात्र पाहताना अवघडल्यासारखे का होते ? पूर्वीच्या काळात राजे आणि त्यांचे सल्लागार हे चौदा विद्या आणि चौषष्ट कलांपैकी बऱ्याच गोष्टी जाणायचे त्याचा परिणाम उत्तमोत्तम शिल्पे , चित्र, काव्य, पुस्तके  निर्माण झाली. मग आत्ताच आपल्या कडे संस्कृतीच्या नावाने बोलताना मध्ययुगीन आणि पुरातन काळातील कलेचा अभ्यास करून हे लोक का नाही बोलत ? कामसूत्र सांगतं: “आनंद हेच मानवी जीवनाचं उद्दिष्ट आहे.” तर कार्ल युंग लिहितो:“स्वतः पीडित असणारेच इतरांना त्रास देतात.”


म्हणूनच प्रश्न कला नाही, प्रश्न आहे  दडपल्या गेलेल्या इच्छाचा. स्त्रियांना कंट्रोल करण्याऐवजी गरजेचं आहे कला शिक्षण सर्वांसाठी खुले करण्याचा.  कारण ज्यांना व्यवस्थेद्वारे फायदा मिळतो त्या स्त्रिया किवां पुरुष वर्ग इतर  तरुण स्त्रिया आणि लहान मुलींच्या स्वातंत्र्यावर तुटून पडतात. त्यांना ट्रोल करतात. तरुण पिढीला तिच्या अभिव्यक्तीपासून दूर केले कि मग ती व्यक्ती मनाने यांची गुलाम बनते. विचाराचे, बोलण्याचे आणि निर्मिती करण्याचे स्वातंत्र्य समाजाला स्वस्थ बनवून मनोरुग्ण बनविण्यापासून वाचावीते. संस्कृती हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा तर्क ( वाद संवाद ), अध्यात्म आणि कलेच्या क्षेत्रातील मुक्त संचार करणारी आपली संस्कृती आहे. ठराविक भाग गरजेपुरता घेऊन उरलेला भाग नाकारणे ही भीती आहे. 


आपल्या देशाला ज्या देशांचा गराडा आहे त्यातल्या बहुतांश देशांमधील स्त्रिया अतिशय अपमानित जीवन जगताहेत. आणि अशा लोकांचा आपल्याला धोका आहे. सुदैवाने आपल्या देशात अजूनतरी कलाकृती पडझड झाल्यातरी अस्तित्वात आहेत आणि कलेचा आदर असणारे अनेक लोक आहेत.त्यामुळे अजूनही आपल्याला आशा आहे. कारण २१ व्य शतकातही अनेक देश पुन्हा एकदा अंधकार युगात स्वतःहून चालले आहेत.    




ree


आरसा ज्यात आपण पाहत नाही


मनुस्मृती सांगते: "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः"

“जिथे स्त्रियांना मान मिळतो, तिथे देवता वास करतात.”

ज्या देशात अनेक धर्मातील लोक आले, वेगवेगळ्या विषयांवर तर्क आणि परिषद व्हावयाच्या असा आपला देश होता आणि आहे. जेथे गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, उभय-भारती  ज्यांनी अनेक पंडितांना, स्वतःच्या पतींसोबत चर्चा आणि वाद संवाद केला जो ऋग्वेदापासून आत्तापर्यंतच्या पुस्तकांमध्ये नमूद केला गेला आहे. दुर्दैवाने त्या वैभवशाली परंपरेपासून आपल्याला खरेतर आत्ताच्या काळात तोडण्यात आले. त्यांचा आत्मा हा विचार आणि कला निर्मिती च्या सर्व क्षेत्रात विहार करीत असताना आता मात्र एंटरटेनमेंटच्या नावाखाली आयटम सॉगच्या नावाखाली मिरवला जातो. तेव्हा ती स्त्री समाजाला मान्य असते.  पण तीच स्त्री स्वतंत्रपणे कलानिर्मिती करते, तेव्हा ते चालत नाही. कारण तेव्हा ती एकटी असते आणि तिचे कार्य हे स्वतःची अभिव्यक्ती असून कोणाच्या ठराविक कार्यासाठी नसते. 

म्हणूनच कार्ल युंगचा इशारा आहे: “कामभावना दाबली तर ती सद्गुण देत नाही, तर विकृती निर्माण करते.”



ree

जे ज्ञान परदेशी जपतात, त्याला आपण लाजतो / दाबतो. 


जेव्हा स्त्रीच्या कलेला लज्जस्पद ठरवलं जाते, तेव्हा प्रश्न तिच्या चारित्र्याचा नसतो  प्रश्न समाजाच्या प्रगल्भतेचा असतो.

आपल्या मंदिरांनी कधीकाळी म्हटलं होतं: “काममयं जगत सर्वम्” संपूर्ण विश्व इच्छा ( कामाने ) शक्तीने भरलेलं आहे.


आज आपण स्वतःचा  वारसा नाकारतो. पण परदेशात लोक योग, आयुर्वेद, तंत्र, षडदर्शने, कामशास्त्र, भरतनाट्यम, संस्कृत साहित्य यावर संशोधन करून, त्यावर प्रचंड कमाई करतात. त्यावर कोर्सेस निर्माण करून आपल्याच गोष्टींची नावे बदलून एक प्रचंड पर्यायी व्यवस्था उभी करत आहेत. त्यांच्या विद्यापीठांमध्ये या सर्व विषयांवर सखोल आणि तौलनिक अभ्यास चालू असताना आपण मागे का ? त्यांच्या स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्यामुळे  ज्याचा परिणाम जगभर फिरून, संशोधन करून कुठल्याहि अंधश्रद्धेच्या पगड्याविरहित ते नवीन कला, ज्ञान घेऊन एक व्यवस्था उभी करताहेत जिचे खरे वारसदार तर आपण आहोत. 


भगवद्गीतेत सांगितलं आहे: “इच्छा सर्वत्र आहे, पण ती समजून मार्गी लावली तरच विजय मिळतो.” आपल्या पूर्वजांना हे कळलं होतं. आपण मात्र दुर्दैवाने आणि आपल्या कर्माने तिला भीतीत आणि बंधनांत रूपांतरित केलं.




ree

खरी समस्या आणि उपाय


तेन नवरन्ध्ररूपो देहः । नवशक्तिरूपं श्रीचक्रम् ।

वाराही पितृरूपा । कुरुकुल्ला बलिदेवता माता ।

पुरुषार्थाः सागराः ।देहो नवरत्नद्वीपः ।

वरील श्लोकाद्वारे भावना उपनिषद सांगतं:“मानवदेह हेच श्रीचक्र आहे. त्याला लाजणे म्हणजे दैवीत्वालाच लाजवणं.”


खरी संस्कृती म्हणजे भीती नाही, तर सौंदर्यदृष्टी. जसं आपण निसर्गाचं सौंदर्य पाहतो, पुरुषांची ताकद पाहतो, तसंच स्त्रीच्या रूपातही सौंदर्य आणि पवित्रता पाहायला हवी. आवश्यक आहे कलाशिक्षण, भीती नव्हे.कला कुठेही जाणार नाही. आपण तिला प्रगल्भतेने सामोरं जाणार का, की अज्ञानाने घाबरणार ? कला समजून घेण्याची क्षमता हवी, घाबरून जाण्याची नाही. आपण तिला प्रौढपणे स्वीकारतो का भीतीने हा एकच प्रश्न आहे. 


आजही भारतातील अतिशय सुंदर शिल्पे आपल्या मायभूमीत नसून इंग्लंड, जर्मनी, अमेरिका आणि न जाणो किती देशांच्या संग्रहालयात आणि वैयक्तिक ( श्रीमंतांच्या ) संग्रहात असतील. कारण त्याची किंमत त्यांना आपल्यापेक्षा जास्त आहे. परकीयांनी आपल्या देवी आणि सुंदरींची शिल्पे फक्त त्यांच्या धर्मात मान्य  नाही आणि नग्न अवस्थेत आहे म्हणून त्यांची नाके, वक्ष स्थळे आणि इतर अवयव कापले. कारण कला शिक्षण, सुसंस्कृतता आणि स्वातंत्र्याचा सन्मान करण्याची वृत्ती त्यांच्यात नव्हती. तर दुसऱ्या लुटारूंनी तिची शिल्पे चोरून नेली.  कामशिल्पांना अश्लील म्हणणाऱ्यांनी आणि आपल्याकडील चार पैशाच्या लोभी माणसांनी परस्पर जेव्हा ही शिल्पे विकली तेव्हा आपले किती नुकसान झाले असेल हे त्यांना देखील माहित नाही.


आपल्या परंपरेचं नाश अज्ञान आणि भीतीमुळे झाला, विशेषतः स्त्रीशक्तीची योग्य ओळख न झाल्यामुळे. जेव्हा पुरुष कमकुवत झाले तेव्हा आपल्या भूमीची कला व परंपरा नष्ट झाली, आणि स्त्रियांना अत्याचार, बलात्कार व मृत्यू सहन करावा लागला. पण जेव्हा पुरुष सुशिक्षित होतात, आपली पुरुषत्वाची खरी ताकद ओळखतात, तेव्हा ते स्त्रियांच्या स्वातंत्र्याला घाबरत नाहीत; उलट ते उभे राहतात आणि त्यांच्या आजूबाजूला सुंदर जग घडवतात.


ree


स्वातंत्र्य म्हणजे धोका नाही


“जिथे स्त्रिया प्रगती करतात, तिथे पुरुषही बळकट होतात.”

खरी संस्कृती स्त्रियांच्या आवाजाला घाबरत नाही.पूर्वजांनी शिल्पं, नृत्य, काव्य यामध्ये मानवी जीवनाचे सर्व पैलू समाविष्ट केले. त्यात भोग आणि योग या दोहोंनाही स्थान दिले. काहीही न नाकारता समत्वाच्या दृष्टीने पहिले . 

त्यामुळे प्रश्न कला बोल्ड आहे का नाही, तो नाही. प्रश्न आहे  स्त्रीला स्वतः ठरवण्याचा अधिकार आहे का नाही.

कारण जेव्हा ती ठरवते, तेव्हा ती केवळ कला निर्मित नाही करत ती इतिहास घडवत असते. आणि इतिहास लिहून ठेवतो आपण तिला गप्प बसवलं, की तिच्या सोबत उभं राहिलो.




 तरुण मुली-महिलांसाठी खास संदेश

प्रिय मैत्रिणींनो,हा लेख फक्त वाद घालण्यासाठी नाही, तर तुमच्यासाठी आरसा आहे.तुमचं शरीर, तुमचं मन, तुमची कला  हे कुणाचं “मालकी हक्काचं” नाही. ते तुमचं स्वतःचं आहे. आज समाज तुम्हाला लाजवतो, उद्या तुमच्या धैर्यामुळे तोच समाज बदलतो.आज तुम्हाला “बोल्ड” म्हणतात, पण उद्या इतिहास तुम्हाला “धाडसी” म्हणेल.


शब्द : योगेश कर्डीले

मॉडेल : के रागिणी योगेश 

सर्व हक्क लेखकास्वाधीन.  


This includes:

  • No AI training or replication

  • No use in mood boards, NFTs, edits, or fan art

  • No sketches, derivative illustrations, or studies based on this work

This space is sacred. Violations will lead to an immediate ban and legal action if needed. Thank you for respecting the spirit and sanctity of this intimate creative space. 🙏🏽


bottom of page