top of page

नायिका 

  • Writer: Raginee K
    Raginee K
  • Jan 24
  • 4 min read

भारतीय शिल्प चित्र आणि नाट्य परंपरेतील कथेचे नेतृत्व करणारे स्त्री पात्र. मानवातील विविध गुण आणि सौंदर्याचा समुच्चय म्हणजेच नायिका. वेगवेगळ्या प्रसंगातून, कथांमधून तिच्यातील गुण आणि सौंदर्य उलगडत जात कलारसिक तिच्यात आपल्या प्रिय व्यक्तीला पाहतात. तिच्या नेत्रकटाक्षाने घायाळ होणारे, साम्राज्य निर्माण किंवा उध्वस्त करणारे, वैराग्य प्राप्त करणारे किंवा उध्वस्त होणारे थोर नायक / खलनायक असे तिच्यात काय पाहतात ? तर या कहाण्या कालरूपात निर्माण करणारा कलाकार मात्र त्याच्या मनातील ती नायिका कोणामध्ये पाहतो ? कोणाला पाहून  कालिदास, राजा रवी वर्मा, बाणभट्ट, हाल सातवाहन यांनी आपल्या अजरामर कथा कवितांतील नायिका निर्माण केल्या असतील ?


कुठूनतरी त्याला तिला निर्माण करण्याची प्रेरणा मिळत असेलच ना ? इतकेच काय तर आत्ताच्या ए.आय. लादेखील डेटा  फीड करावा लागतो. प्रत्येकाच्या दृष्टीने त्याची / तिची नायिका वेगवेगळी असते. दमयंती, शकुंतला, यशोधरा, उर्मिला, सीता, द्रौपदी, सावित्री, सती, पार्वती, मीरा, अक्का महादेवी, कण्णगी, मालविका, 


अनेक महाकाव्य, नाटके, कथा यातील शूरवीरांच्या कथा वरवर शौर्य, साहस यांच्या असल्यातरी कुठेतरी स्त्री पात्रांच्या साह्यायानेच त्या कथांना एक वळण लागते. मग ते कोणीतरी कोणावर प्रेम करीत असेल, कोणाच्या तरी प्राप्तीसाठी टोकाला जाऊन पराक्रम करीत असेल. किंवा कोणी तरी सर्व काही सोडून गेलेला असेल. महान राजे, योद्धे, सेनानी, तत्वज्ञानी, देव इत्यादी हे सर्व कुठेतरी स्त्रीत्त्वानेच शांत झाले.  प्रेम रसात त्यांच्यातील पुरुषत्व झळाळून गेले. तर कोणी प्रेमात सर्व जग नष्ट करायला निघाला, तर कोणी सोडून विरक्त बनला. महाकाव्यांना जिच्या शिवाय शब्द सुचू शकत नाही अशी ही नायिका सर्व कथांचा आत्मा होती. अशी ही प्रेरणादायी नायिका त्या कवींनी, कलाकारांनी कशी आपल्या माध्यमातून व्यक्त केली असेल ? 


शारीरिक सौंदर्य आणि आत्मा यांचे एकत्रीकरण भारतीय कलाकारांनी जे केले ते कोणाला पाहून केले असेल ? त्या पौराणिक नायिका कोणाला पाहून या लोकांना स्फुरल्या असतील ? मला वाटते नायिका हा एक भाव आहे. रोजच्या व्यवहारातील ती स्त्री एका लयीत चालणारी. पंचमहाभूतांशी नैसर्गिकरित्या जोडली गेलेली. पाण्याच्या लाटा, वाऱ्याचा वेग, झाडांची शीतलता, नागासारखी पृथिवीशी जवळीक साधून देखील वेगळी झळाळणारी, मंजुळ आणि तितकीच तीव्रता आपल्या आवाजातून व्यक्त करणारी अश्या या नायिका त्यांना आपल्या आसपास रोजच दिसल्या असतील. शरीर सौंदर्य पाहत पाहत हळू हळू तो तिच्या डोळ्यात स्वतःलाच पाहू लागला असेल. कधी एखाद्या प्रेमिकेच्या प्रेमात वेडा होऊन केव्हा तरी तिच्या सहवासात त्याला असे काही गवसले असेल जे शरीराच्या आणि मनाच्या ही पलीकडचे असेल ? या शिल्पांमधील अध्यात्मिकता ही कल्पित नसून साक्षात अनुभूतीच तिच्या मागे आहे. 


भारतीय स्त्रिया ( नायिका )  पहिल्या कि मला त्यांच्यात एक स्थिरता, गूढरम्य शक्ती वाटते. परिस्थितीने असेल कदाचित परंतु भारतीय नायिकेची शक्ती तिच्या ध्यानस्थ वावरण्यातून जाणवते. मग ती मोहक किंवा कामुक हावभाव करताना देखील स्वतःतील शकतीलच संचालित करीत असते. सद्यस्थितीतील भारतीय पुरुष जितका उच्शृंखल ( वरपांगी ) दिसतो त्याच्याच उलट भारतीय नायिका मात्र येथील भूमीला पुष्ट करणारी, समाजाला स्थिरत्व देणारी दैवत्वाची मूर्ती वाटते. आपण तिचा किती सन्मान करतो ही वेगळी गोष्ट ! एकाच वेळी काम आणि ध्यानस्थ मुद्रा या दोन्हीही गोष्टी तिचाच ठायी असतात. तिच्या अंगावर मग झिरझिरीत वस्त्र असो किंवा अनावृत असो, ती कामचेष्टांमध्ये मग्न असो किंवा नृत्यामध्ये, एखादे फुल केसांमध्ये माळीत असो, किंवा कुठलेही काम करीत असो तिच्यातील दैवत्व थोडीदेखील कमी होत नाही. कदाचित हे फक्त एखाद्या कलाकाराला किंवा ध्यानी व्यक्तीला दिसत असेल.  हे तिच्यावरील कलाकाराचे प्रेम म्हणावे कि तिच्यातला प्रकाश जो फक्त त्या डोळस माणसाला दिसला आणि सुदैवाने तत्कालीन राजांनी त्या कलाकारांना आश्रय दिला ? 


आज संसस्कृती, कपडे, नग्नता, श्लील आणि अश्लील यांचा समाजमाध्यमांवर चाललेला गदारोळ पाहताना आपण शिक्षित आणि डोळस व्हायचेच राहून गेलो असे वाटते. स्त्रियांकडे पाहताना ती जी उत्कटता, प्रेम, आदर , इतकेच काय तर काम भावना कशी व्यक्त करावी हे आपला समाज उन्मादात विसरून गेला असे वाटते. मंदिरांवरची शिल्पे मग कशाकरिता निर्माण केली होती ? कथा , कविता आणि चित्रे कशी होती ? त्यातील वर्णने, वस्त्रे, भाव, मुद्रा कशा होत्या ? आपण त्यातून काय शिकतो ? आपण मंदिरांना भेट देऊन, राजा रवी वर्माच्या चित्रांना आपली संस्कृती म्हणताना त्यांना कधी नीट वाचतो का ? ते डोळे, ते मानवी शरीराचा आणि आत्म्याचा एकाचवेळी चाललेला उत्सव या  शिव-शक्तीच्या भूमीत विसरून चाललो असे वाटते. 


कालीचा क्रोध, द्रौपदीचा सूड, सतीचा पती प्रेमातील त्याग व स्वाभिमान, सावित्रीचा हट्ट, लोपामुद्राचें ज्ञान, यशोधरेचा त्याग आणि ज्ञान, अक्का महादेवीचे शिव प्रेम हे आपण कदाचित सोयीस्कररीत्या विसरून गेलो. आणि आत्ता आपल्या आसपासच्या नायिकांना ( स्त्रियांना ) अंग चोरून का वावरावे लागते ? पाश्चिमात्य प्रभावाची निंदा करताना आपण खरा पौर्वात्य प्रभाव नेमका काय आहे ? तो इतर देशांमध्येदेखील कसा झिरपला हे कधी शाळेत / महाविद्यालयात अभ्यासतो का ? नायिका मग ती शृंगारिक, अध्यात्मिक, शौर्य, हास्य, उत्सव, काव्य यापैकी कुठल्याही भावभावना व्यक्त करते तेव्हा तिच्यातील शक्ती हि आदिवासी ते नागर ( शहरी ) स्त्रियांमध्ये एकच असते. तिचे ते नैसर्गिक व्यक्त होणे, ते एका कलाकाराला पाहायला मिळणे आणि समाजाने ते कलेच्या माध्यमातून स्वीकारणे याला समाज एकूणच प्रगल्भ लागतो. 


प्रत्येक काळातील नायिका ज्या पद्धतीने व्यक्त होतात मला असे वाटते कि ते त्या समाजाचे प्रतिनिधित्व असते. स्त्रीला खुला अवकाश दिल्यावर ती काय करू शकते तर ती आपले जीवन सर्वांगाने समृद्ध करते. फक्त आई, बहीण, पत्नी या नात्यांच्या पलीकडे ती स्वतः आपल्या आयुष्याची नायिका असते. तिचे अस्तित्व हे फक्त कलेमध्ये सौंदर्य निर्मितीसाठी नसून आयुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी होते म्हणून ती नायिका होती. जीवनासाठी आवश्यक असणारी शक्ती, निर्मितीमागची काम शक्ती, पुरुष तत्वाशी विश्वासोबत जोडणारी अध्यात्मिक शक्ती अशी ही नायिका समाजाचा मेरुदंड ( कुंडलिनी ) असते. तिच्यातील नायिकेला जिथे कुठे पूजिले गेले त्या त्या प्रत्येक ठिकाणी स्वातंत्र्य, अध्यात्म, कला आणि काम या सर्वांचा एकत्रित उत्सव झाला. चित्त जिथे भीतिशून्य उन्नत जिथे माथा , मम देश ही जागृत होवो या मुक्त स्वर्गी आता असे जे रवींद्रनाथ म्हणाले ती स्थिती तुम्हाला जिथे कुठे दिसेल तिथे त्या देशाची नायिका तुम्हाला कथा कवितांच्या पानातून, चित्र आणि शिल्पांमधून तुमच्या आसपास वावरताना दिसेल.


शब्द आणि छायाचित्र : योगेश कर्डीले 

मॉडेल : के. रागिणी योगेश 

सर्व हक्क राखीव.

Muse : K Raginee Yogesh

Words & Images : Yogesh Kardile


By accessing this content, you agree to not download, screenshot, redistribute, repost, alter, illustrate, paint, trace, use as reference, manipulate, or share it in any form publicly or privately without my prior, written permission.

This includes:

  • No AI training or replication

  • No use in mood boards, NFTs, edits, or fan art

  • No sharing via messaging apps or forums

  • No re-uploads on social media or other platforms

  • No sketches, derivative illustrations, or studies based on this work

This space is sacred. Violations will lead to an immediate ban and legal action if needed. Thank you for respecting the spirit and sanctity of this intimate creative space. 🙏🏽

Comments


bottom of page