top of page

आषाढस्य प्रथम दिवसे…

  • Writer: Raginee K
    Raginee K
  • 7 hours ago
  • 4 min read

आषाढस्य प्रथम दिवसे…आषाढाचे सर्वात जास्त महत्त्व कोणाला असते? त्या काळ्यानिळ्या ढगांची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला, चातक पक्ष्याला, पावसात नर्तन करण्यासाठी आतुर असलेल्या मोराला, लहान मुलांना की प्रेमीयुगुलांना? प्रत्येकाची गरज निराळी, त्या ढगांचा अर्थ निराळा. नेहमी येतो पावसाळा अशा त्या ऋतूने जेव्हा महिनाभर ताणले तेव्हा वाफाळलेला चहा आणि भजी यांची तयारी करणारे खिडकीत बसून मोकळे आकाश पाहतात. पण जेव्हा उशिरा का होईना काळे ढग क्षितिजावर दाटून येतात, गार वारा सुटतो, पालापाचोळा सोसाट्याच्या वाऱ्यात वांड पोरासारखा उडत जातो  तेव्हा सगळे घराकडे जाण्याची तयारी करतात. छत्र्या बाहेर निघतात. पण अशाच वेळी कोणीतरी त्या वाऱ्यात किनाऱ्यावर येते  आपल्या भावनांना वाट करून देण्यासाठी, तो पाऊस अंगावर झेलण्यासाठी. कोणी उंच टेकडीवर जाऊन जणू काही प्रियकर किंवा प्रेयसीच आली आहे असे समजून त्या ढगांच्या आगमनाचा उत्सव करतात.


एसो सखि पावस रितु आयल घन गरजे दमिनी दमके हिया मोर कम्पित भेल ।


हे सखी, पहा हा पाऊस आता आलाय. ते गरजणारे ढग, ती विद्युल्लता  त्यांच्यासोबतच माझे हृदयही कंपित होतेय.  - विद्यापती


अनेक शतकांपूर्वी जेव्हा या जंबुद्वीपावर कन्याकुमारी ते हिमालय ढगांना अडविणारे फक्त पर्वत आणि वने होती, तेव्हा प्रेमी युगुलांच्या ओढीला आणि उत्कटतेला कालिदासाने मेघदूताच्या रूपाने शब्दबद्ध करून अमर केले. इतके की मॅक्स मुलर नावाचा जर्मन इंडोलॉजिस्ट विद्वान कालिदासाच्या शब्दांच्या प्रेमात पडला. कारण कोरड्या तत्त्वज्ञानापुढे अनुराग कधीही श्रेष्ठ. त्या भावनेत बुडालेला यक्ष जेव्हा मेघालाच  ढगाला  आपल्या यक्षिणीकडे दूत म्हणून निरोप पोचव असे सांगतो, तेव्हा कालिदासाच्या त्या कल्पनेतून जगाला प्रेम, भारतीय अवकाश, वने, पर्वत, नगरे, नद्या या सर्वांचेच दर्शन घडते.


आसारसंततिनिपातपटुप्रघोषैः केकावलीभिरभितः क्वणितैर्मयूरैः । 

पुष्पाणि वर्षति च काननमञ्जुमञ्जु कामस्य सायकनिकाय इव प्रकाशः ॥


वनांमध्ये जोरदार पाऊस आपल्या वजनदार थेंबांसोबत फुलांनाही धरणीवर घेऊन येतोय. चहूबाजूंनी मोर केकारव करीत आहेत  जणू काही प्रत्यक्ष कामदेवाचे बाण दृश्यमान झाले आहेत.


आषाढ ऋतूचे महत्त्व प्रत्येकासाठी वेगळे जरी असले तरी सर्व ऋतूंमध्ये सर्वश्रेष्ठ असा हा एकमेव ऋतू आहे जो प्रेम, विरह, आनंद, भय, आश्चर्य आणि भक्ती या सर्व रसांमध्ये आपल्याला न्हाऊन टाकतो. कोणी प्रेयसीसाठी विव्हळ होतो तर कोणी भगवंताच्या भेटीसाठी वारीस निघतो, कोणी गड-किल्ल्यांच्या वाटेवर हरवून जातो तर कोणी पुराच्या पाण्यात निर्भीडपणे पोहतो. कोणी पावसालाच कागदावर रंग आणि कवितांच्या रूपात उतरवतो. तो मात्र चुपचाप खिडकीतून पावसाच्या धारा मोजतो. त्याला आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत  त्याच्यासाठी तर हा पाऊसच सर्वात जवळचा सखा. चुपचाप निसर्गाची रौद्र लीला आणि सोबत येणारे खळाळणारे सौंदर्य न्याहाळत स्वतःत हरवून जायचे. लोकांना त्याची अनुपस्थिती कळतच नाही. कालिदासाने असे किती पावसाळे पाहिले असतील? त्याचे मन कोणावर आले असेल? नात्यांच्या पलीकडे असलेली आसक्ती, ती उत्कटता त्याने कवितेच्या रूपातून शब्दबद्ध करून स्वतःच्या भावनांना यक्षाच्या रूपात मेघदूतम मध्ये सादर केली असेल का? 



प्रेमभावना आणि आषाढ यांचे नाते अतिशय नैसर्गिकच म्हणावे  नव्हे, तेच एकमेव सत्य आहे. गारव्याने धरणीवर येणारा वजनदार पावसाचा प्रत्येक थेंब तिच्याच चैतन्याचे रोपण करतो. तिच्यात खोलवर रुजलेले बीज आणि हे नवजीवनाचा स्फोट घडतो. तीच घटना प्राणी, पक्षी आणि मानवी जीवनात मिलनातून घडते. अगदी समुद्राच्या अंतरंगापासून ते घनगर्द जंगलापर्यंत मिलन आणि निर्मितीचा खेळ सुरू होतो. तापलेली धरणी सागरावरून येणाऱ्या गार वाऱ्याने आणि पाण्याच्या शिडकाव्याने शांत होते  आणि त्या मिलनानंतर क्लांत होते. निसर्गाच्या नियमाने सुरू झालेला हा खेळ सर्वांच्या तनामनात सुरू असतो. फक्त जेव्हा हा पाऊस कवीच्या मनाला भिडतो तेव्हा स्थळ, काळ, धर्म, संस्कृती यांची बंधने ओलांडून तो पाऊस लोकांच्या मनात घर करतो.


इदमधिकमनोज्ञं रूपमस्याः प्रसूत्या नवजलकणलोलैर्मुग्धमालोकमात्रात् । 

सरसिजमनुविद्धं शैवलेनापि रम्यं मलिनमपि हिमांशोर्लक्ष्म लक्ष्मीं तनोति ॥


तिचे सौंदर्य पावसाच्या प्रत्येक थरथरणाऱ्या थेंबाने द्विगुणित झाले आहे  जसे कमळाचे फूल आसपासच्या हिरवळीने अधिक उजळते, आणि चंद्र त्याच्यावरील विवरांनीही अधिकच सुंदर दिसतो. 

 अभिज्ञानशाकुन्तलम्

हीच ओढ, हाच अनुराग कालिदासाने केवळ मेघदूतातच नाही तर अभिज्ञानशाकुन्तलममध्येही वेगळ्या रूपात मांडला आहे. जन्माला आलेल्या व्यक्तीला जात, धर्म आणि इतर गोष्टी ठरवून शिकवल्या जातात. परंतु आत खोलवर वाहणारी ही ओढ मात्र त्या सर्वांवर मात करते  ती प्रत्येक जिवाच्या अंतरंगीच असते. जसे पावसाचा प्रत्येक थेंब चैतन्य घेऊन येतो, झाडी फुलतात  तसेच तेच पाणी आपल्या आत वाहत आपल्याशी एकरूप होते. जेव्हा तो तिला पहिल्यांदा पाहतो किंवा ती त्याला पाहते  ते आकर्षण रक्तातील प्रत्येक थेंबात अगदी तसेच असते जसे ते कालिदासाच्या वेळी होते.



आद्यकवी वाल्मीकींनी पाहिले की एका शिकाऱ्याने प्रेमात मग्न असलेल्या क्रौञ्च पक्ष्याची शिकार केली. आपल्या साथीदाराचा झालेला वियोग सहन न होऊन त्याभोवती घिरट्या घालत पक्षिणी विलाप करीत होती. त्या क्रौञ्चवधाच्या घटनेने त्यांना संस्कृत साहित्यातील आद्यकवी बनवले. जेव्हा त्या पक्ष्यांच्या प्रेमाचा स्पर्श महाज्ञानी व्यक्तीला झाला, तेव्हा त्या भावनावेगात शोकाचे परिवर्तन श्लोकात झाले शोकः श्लोकत्वमागतः ।आणि रामायण निर्मितीआधी क्रौञ्चवध ही आद्यकविता प्रेमाच्या रक्षणाकरिता स्फुरण पावली.

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः । यत्क्रौञ्चमिथुनादेकमवधीः काममोहितम् ॥

हे निषादा  तुला अनंत वर्षे कधीही विश्रांती मिळो नये, कीर्ती मिळो नये, कारण तू या क्रौञ्च पक्ष्यांच्या जोडप्यातील  प्रेमाच्या परमानंदात हरवलेल्या  एकाला मारले आहेस.

अशा त्या आसक्तीच्या, उत्कटतेच्या ऋतूत  पावसाने ओलीचिंब झालेली ती आणि तो कामभावनेला आपोआपच शरण जातात. निर्मितीच्या ऋतूत जिथे सारा निसर्ग नव्याने खेळ रचतो, तिथे मानवी मने त्याहून निराळी का बरे असतील? किंबहुना अशा वेळी जर कोणी चार पैशांचा हिशेब मांडत कामात व्यग्र असलेल्या माणसांना पाहिले की मला हिंदी चित्रपटातील हे गीत आठवते 

"हाय हाय ये मजबुरी, ये मौसम और ये दूरी, तेरी दो टकिये की नौकरी में मेरा लाखों का सावन जाये ।"


खरे आहे ना? आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक म्हणजे पावसात भिजणे. आज जो पाऊस आहे तो उद्या वाट पाहायला लावेल, कधी आपणच त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. तो कोसळताना आपण निर्माण केलेले कुठलेही भेद तो पाहत नाही. आपण सर्व त्याच्यातूनच निर्माण झालेलो  आपल्या आत खेळणारा तोच. जेव्हा तो नर्तन करायला येतो तेव्हा आपण बाहेर पडायलाच हवे. मग ती लहान मुले असोत, वृद्ध असोत, मुली असोत, स्त्रिया असोत  कोणीही असो. त्या नर्तनातले, भिजण्यातले सुख हेच खरे नैसर्गिक सुख. कोणी पाहो वा आपण एकटे असू  तो पाऊस ही त्या महामायेचीच कृपा. आपल्या आत अगदी खोलवर असलेले बीज पुन्हा अंकुरण्यासाठी, प्रेमभावनेला वाट देण्यासाठी, शेतजमिनीसाठी, सर्व पशुपक्ष्यांसाठी आणि सर्व प्रेमी जीवांसाठी  आषाढाचा हा निसर्गसोहळा. तो येतो, भिजवतो, आणि आपल्या आत खोलवर दडलेले सारे जिवंत करतो.



मॉडेल : के. रागिणी योगेश

 लेखन आणि छायाचित्रण : योगेश अशोकानंद कर्डीले Photographer · Filmmaker · Writer · Visual Arts Lecturer Documenting & Researching Indian Culture, Arts & Evolving Society





Comments


bottom of page