उत्सव सौंदर्याचा
- Raginee K
- 5 days ago
- 8 min read
आदिमानव गुहांपासून ते A.I. पर्यंत

आदिमानवाची गुहा आणि प्राण्याची गुहा यातला फरक कसा ओळखावा ? एकच साधा निकष माणसाने काढलेली चित्रे. पण मग एक प्रश्न मनात उरतो : त्याने चित्रे का काढली ? भूक लागली होती, शत्रू होते, थंडी होती तरीही त्याने वेळ काढून रेघा ओढल्या. का म्हणून त्याला व्यक्त व्हावेसे वाटले असेल ?
तोच मानव जेव्हा शेतकरी बनला, तेव्हा त्याने रेषांच्या पलीकडे जाऊन शिल्पे घडवली, मंदिरे उभारली. अमेरिकेपासून जपानपर्यंत सगळीकडे आपापले देव कल्पिले आणि ते सगळे सुंदरच असले पाहिजेत असा जणू एकमताने ठरवले. कोणाचे देव नाचत होते, कोणाच्या हाती शस्त्रे होती, कोणी प्रेमाचा संदेश घेऊन आले होते. आफ्रिकेत रंगांची लयलूट होती. इटली, फ्रान्सच्या चर्चेस आणि संग्रहालयांमध्ये सौंदर्याचा एक सलग, न संपणारा उत्सव चालू होता. रोम, ग्रीसमध्ये मानवी देह वस्त्र ल्यायलेला असो किंवा नग्न अत्यंत तन्मयतेने संगमरवरात उतरवला गेला. कंबोडियाच्या मंदिरांमध्ये, चीनमध्ये, जपानमध्ये, पर्शियामध्ये ( इराण ) जिथे जिथे माणसाला थोडी स्थिरता मिळाली, तिथे तिथे कलेच्या माध्यमातून मानवी देहाचे सौंदर्य वेगवेगळ्या रूपांत साजरे झाले.
दुसऱ्या महायुद्धात हिटलरने पॅरिसवर कब्जा केला तेव्हा तेथील लोकांनी संघर्ष टाळला कारण आपली कला वाचवायची होती. त्याच वेळी ब्रिटिश आणि इतर युरोपीय राज्यकर्त्यांनी जाईल तिकडच्या सुंदर कलाकृती लुटल्या, चोरल्या. सौंदर्यावर एवढे प्रेम, एवढी लालसा याचे कारण एकच : सौंदर्य ही शक्ती आहे, हे त्यांना कळले होते.
आपल्याकडे मात्र एक विचित्र दांभिकपणा आहे. एकीकडे ‘फॅशन म्हणजे थिल्लरपणा, मेकअप म्हणजे उथळपणा’ असा प्रचार होतो. पण मानवी मनाच्या खोलवर असलेल्या भावना किंवा इच्छा यांची अत्यंत अचूक माहिती या क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलाकार आणि व्यावसायिकांना असते.हडप्पा-मोहेंजोदडोच्या उत्खननात लिपस्टिक आणि फेस पेंट सापडले. साधारण तीन हजार वर्षांपूर्वीच्या इजिप्तच्या राणीच्या कबरीत तिचे मेकअप किट सापडले. आणि ज्यांना आपण मानवी संस्कृतीचे खरे वारसदार मानतो त्या आदिवासी स्त्रिया आजही पाना-फुलांपासून शृंगार करतात. असा हा सौंदर्यवर्धक शृंगार हा माणसाचा स्वभावधर्म आहे, पाप नाही.

कालिदास, वात्सायन, अमरू, जयदेव यांच्या शब्दांना जगातील विद्वानांनी डोक्यावर घेतले. गाथा सप्तशतीने स्त्रियांच्या प्रेमाला, आनंदाला, दुःखाला वाट दिली त्याचा आपल्याला अभिमान आहे. अजिंठा आणि वेरूळच्या लेण्यांतील सौंदर्यलतिका पाहायला जपान ते युरोप, अमेरिकेचे लोक येतात. त्या शिल्पांमधल्या स्त्री पुरुष आपलेच ; फक्त एक दोन हजार वर्षांपूर्वीचे. म्हणजे त्या काळी मानवी देहाविषयी, सौंदर्याविषयी जास्त समज होती असे म्हणायला हरकत नाही का ? आज अशी कलाकृती कोणी निर्माण केली तर तिचे तेवढेच कौतुक होईल का ?
सत्यम् शिवम् सुंदरम्
आपल्या संस्कृतीत सत्य, कल्याण आणि सौंदर्य या तिघांना एकत्र का मानले ? कारण ‘यत् पिंडे तत् ब्रह्मांडे’ जे आपल्या आत आहे तेच या सगळ्या विश्वात आहे. मानवी देहात जे सौंदर्य आहे तेच निसर्गात आहे. नव्हे, सौंदर्य आणि लय हा निसर्गाचाच मूळ स्वभाव आहे.
म्हणूनच एखादा शंख पाहिला, पक्ष्याचा पंख पाहिला, पिसारा फुलवून नाचणारा मोर पाहिला, एखादी सुंदर स्त्री पाहिली, एखादा लहान बाळ पाहिले कि मन आपोआप आनंदते. आपल्याला निसर्गाचा उत्तम आविष्कारच आवडतो. जुन्या कथांमध्ये राजे,राण्या,राजकुमारी सुंदर का असतात ? कारण सौंदर्य ही एक शक्ती आहे. जिथे लय आणि समतोल असतो, तिथे शक्ती असते मग ती सृजनाची असो, तारणाची असो किंवा संहाराची.

कालिदासाने अभिज्ञानशाकुंतलममध्ये म्हटले : ‘सा संभावित मौलिभिः परिचिता’ तिचा खरा परिचय त्यालाच होऊ शकतो, ज्याचे डोळे तिला समजण्याच्या लायकीचे आहेत. सौंदर्य पाहण्यासाठी आधी आतले डोळे उघडे असावे लागतात.
कलासाक्षरता : जी आपल्याला कधी दिलीच नाही
एक कलाप्रवासी म्हणून मला एक प्रश्न कायम सतावतो शाळांमधून अजिंठा, वेरूळ, खजुराहो यावर लेक्चर्स का नव्हती ? आपल्या संस्कृतीची अशी अर्धवट ओळख आपल्याला का दिली गेली ? मानवी शरीर हे जीवशास्त्राच्या पलीकडेपण सौंदर्य आणि प्रमाणबद्धतेचे एक अद्भुत उदाहरण आहे हे आपल्याला कलेच्या माध्यमातून का शिकवले गेले नाही ? कालिदासाचे काव्य वाचवले नाही. कामसूत्र हे केवळ ‘त्या’ गोष्टीचे पुस्तक आहे असा समज मनावर ठेवला गेला.
अशा समाजात मुले मोठी झाली ज्यांच्या आयुष्यात कधी प्रेम आले नाही, कला आली नाही, सौंदर्य आले नाही, संगीत आले नाही. जी फक्त मिरवणुकीत डीजेच्या तालावर दारू पिऊन नाचली. हीच मुले पुढे समाजमाध्यमांवर आली. कलाकारांच्या कामावर, स्त्रियांच्या शृंगारावर, नृत्यावर द्वेषाने बोलू लागली. मुलींना छेडू लागली. कारण त्यांच्या आत एक मोठी उणीव होती सौंदर्याशी कधीच झालेला परिचय नव्हता. हा रानटीपणा एका रात्रीत निर्माण झाला नाही. शिक्षक, पालक, समाज सगळ्यांनी मिळून हे घडवले.
आपल्या गावात एखादे जुने मंदिर असेल तर आत जाऊन शिल्पे नीट पाहा. मानवी जीवनाचा उत्सव, सौंदर्य, शृंगार आणि योग सगळे एकत्र सापडेल. मला हे कळायला अनेक वर्षे लागली, अनेक राज्यांचा प्रवास करावा लागला. आणि विचित्र गोष्ट म्हणजे, हे परदेशी लोकांसोबत फिरल्यावर जास्त कळले. त्यांच्या नजरेतून पाहिले तेव्हा आपला देश खरोखरीच सोन्याची खाण वाटला. ते लोक खजुराहो, बेलूर, हळेबिडू, हंपी, बदामी, पट्टडक्कल सगळीकडे जातात, अभ्यास करतात. भारतीय स्त्रियांचा शृंगार, साडी, पश्मिना, बनारसी सिल्क यांच्याबद्दल त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असते. आपलीच गोष्ट, आपल्यालाच माहीत नाही.
निर्गुणाकडचा प्रवास सगुण सौंदर्यातून
जगात कुठलेही तत्त्वज्ञान येवो निर्गुण, सगुण, एकेश्वरवाद, बहुईश्वरवाद किंवा नास्तिकता. त्या सर्वांचा पाया मानवी मन आणि देह यांच्यावरच आहे. आणि आपापल्या देवतांच्या कल्पना करताना प्रत्येकाने सुंदरातील सुंदर रूप त्यांना दिले. का ? कारण निर्गुणापर्यंत जायचे असले तरी सगुण ध्यान हे अतिसुंदरच असले पाहिजे सौंदर्यावर लक्ष आपोआपच केंद्रित होते, आनंदनिर्मिती होते.
कोणी देवाला मेघश्याम म्हटले, कोणी कर्पूरगौर, कोणी सूर्यासारखा तेजस्वी तर कोणी चंद्रासारखी शीतल. तर नृत्याच्या माध्यमातून त्याच मानवी सौंदर्याचा सर्वोत्कृष्ट अविष्कार घडविला . कथक, भरतनाट्यम, कथकली, कुचिपुडी प्रत्येक नृत्यप्रकारात लय, भाव आणि शृंगार यांचा सामूहिक परिणाम आजही माणसाला एका उच्च मानसिक पातळीवर घेऊन जातो, आणि त्यातूनच संस्कृती घडते. संस्कृती म्हणजे दुसरे काय असते ती सौंदर्याची एका विशेष रूपात केलेली पूजाच असते.

दुर्दैवाने आपण आपली आदिवासी, ग्रामीण आणि नागर संस्कृतीतील अनेक गोष्टी हरवून बसलो. कलासाक्षरता क्षीण झाली. बाजारकेंद्री सादरीकरणाने झटपट तृप्ती देणाऱ्या गोष्टींचा जमाना आला. अपवादात्मकरित्या प्रायोगिक आणि पारंपरिक परंपरांचे संवर्धन होत आहे पण त्याचा वेग आणि आवाका अजूनही लहान आहे.
सौंदर्य आणि अमरत्वाची ओढ
सातवाहन, मौर्य, गुप्त, चंगेझ खान, गझनीचा महमूद, मुघल, मराठे, कंबोडियाचे राजे जे कोणी या जगात होऊन गेले, त्यांनी युद्धात नरसंहार केला. कोणासाठी ते तारणहार होते, कोणासाठी कर्दनकाळ. पण त्याच लोकांनी कलाकार, कवी, लेखक यांना आश्रय दिला. मंदिरे, समाध्या, भव्य वास्तू उभ्या केल्या. का ? कारण आपल्यानंतर जग आपल्याला आठवावे आपण निर्माण केलेल्या सौंदर्यासाठी. हे त्यांना माहीत होते. सोमनाथाचे वैभव लुटणाऱ्या गझनीच्या मोहम्मदाने शाहनामे ( इराणचा सर्वात महत्वाचा ऐतिहासिक ठेवा ) साठी लेखकाला इनाम दिले. ( त्याने ते घेतले नाही हि त्यामागची गोष्टी निराळी ). परंतु एके ठिकाणी विध्वंस करून दुसरीकडे नवनिर्मिती करणारे राजे आपल्याला नवीन नाहीत.
आपण युरोप, कंबोडिया, बाली, थायलंडला का जातो ? तेथील शिल्पे, चर्चेस, मशिदी, नृत्यप्रकार पाहायला. आपण आपल्या गोष्टींचे रक्षण करू शकलो नाही त्यामुळे आपल्याच कलाकृती आता परदेशी संग्रहालयांमध्ये जाऊन पाहाव्या लागतात. माणसाची सर्वोच्च प्रगती त्याच्या इमारती, गाड्या, रॉकेट यात आहेच पण त्याने निर्माण केलेल्या कलाकृती त्याच्या अंतःकरणाची साक्ष देतात. म्हणूनच अबू धाबीने अफाट पैसे असूनही लुव्र्हची शाखा उघडली. पैसे असले म्हणजे संस्कृती विकत मिळत नाही. परंतु खूप पैसे मिळविल्यावर प्रत्येकाला मी सुसंस्कृत आहे हे ठसविण्यासाठी किंवा विशिष्ट वर्तुळात जाण्यासाठी सौंदर्य, कला यांचाच आधार घ्यावा लागतो.
तंत्रज्ञान आणि सौंदर्य
आपण फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम जे काही वापरतो आणि पुढेही वापरणार आहोत त्यातून जर चित्रे, छायाचित्रे आणि व्हिडीओ काढले तर मागे उरेल फक्त एक सांगाडा. कारण तंत्रज्ञानही शेवटी सुंदर गोष्टी सोप्या करण्यासाठीच आहे. माणसाला माणूस पाहायला आवडतो. आपण कितीही तंत्रज्ञान, विज्ञान किंवा अध्यात्माचे प्रेमी असलो, तरी आपण आधी एक सामाजिक प्राणी आहोत आणि आपल्याला सौंदर्य आणि प्रेमाची भूक कायम असते. निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीत जी सहजता, उपयुक्तता येते ती जगण्यासाठी सक्षम करण्याकरिता येते. त्यात जी एक लय असते ती जीवनावश्यक आणि सुंदर असते त्यामुळेच आपल्याला ती प्रत्येक नैसर्गिक गोष्टीत आढळते. त्यामुळेच आपल्या तंत्रज्ञान वापरतानादेखील सुंदर गोष्टीच वापरू वाटतात आणि त्यांच्या डिझाईनमुळेच त्यांची किंमत जास्त असते. फार दूर जाण्याची गरज नाही फक्त आयफोन व इतर फोन यांची तुलना केली तरीही कळेल.
A.I. चा कुठलाही प्लॅटफॉर्म, सॉफ्टवेर वापरले तरीही एकाच लक्षात येईल कि पूर्वीच्या मानवी मर्यादा आता त्याला लागू नाही. जगातील भूतकाळात घडलेले सर्व कलाकारांचा मेंदू आज त्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेने आपलासा केलेला आहे. त्यामुळे स्टूडियो घिब्ली पासून ते लिओनार्दो , मायकेल अँजेलो ते व्हॅन गॉग कुठल्याही कलाकाराच्या शैलीत ते आपल्याला अगदी मोफत चित्रे काढून देते. साऱ्या जगात लोक क्षणात आपले हव्या त्या प्रकारे चित्र तर कोणी व्हिडीओज जेव्हा बनवून घेतात तेव्हा आपली प्रतिमा अजून किती सुंदर दिसेल याचाच विचार करते. त्यामुळे तंत्रज्ञान हे मानवी आकांक्षेसाठीच वापरले जाते आणि त्यात सौंदर्याची इच्छा मानवाला अजून कल्पक बनविते.
निसर्गाचा समतोल म्हणजे सौंदर्य
हिमकणापासून ते हिमालयापर्यंत सगळे निसर्गनियमानुसार घडते, आणि म्हणूनच सुंदर असते. सौंदर्य हा विश्वाचा नियम आहे. त्याविरुद्ध असणारी गोष्ट विकृतीच असते मग ते वाढलेले पोट असो किंवा अतिसुकलेले शरीर. आपल्या दिलेल्या देहाचा तिरस्कार करणे ही एकप्रकारची मानसिक विकृती नाही का ?
आज एका बाजूला सामान्य समाजाची आवड बिभित्सतेकडे झुकत चालली आहे, तर दुसरीकडे अतिश्रीमंत वर्गात पश्चिमी सौंदर्य मूल्ये वाढली. शंखिनी, चित्रा, पद्मा, गजगामिनी अशा अनेक वेगळ्या गुणांनी युक्त असलेल्या स्त्रिया आपल्या आसपास असताना, शकुंतला, मालविका, सावित्री, लोपामुद्रा, यशोधरा, उर्मिला सारख्या शेकडो नायिकांच्या कथा असताना खऱ्या खुऱ्या सुंदर भारतीय स्त्रियांत त्यांच्या रंग आणि आकारावरून न्यूनगंड निर्माण करून त्यांना अँजेलिना जोलीसारखे ओठ किंवा किम कार्दशियनसारखा फिगर हवा असे वाटवण्याची किमया बाजार करतो. शरीरात सिलिकॉन भरण्याची, फिलर्स आणि इंजेक्शनने नसलेले सौंदर्य अंगी आणण्याची चढाओढ हे सगळे मार्केटने घडवलेले आहे, संस्कृतीने नाही. आपण आपल्या मातीपासून, निसर्गापासून तुटलेलो असलो तर असेच एका फुग्यात तरंगत राहू.

सौंदर्य आणि भयानकता
निसर्गाने प्राण्यांना आणि लहान मुलांनाही सौंदर्य आणि भयानकता ओळखण्याची शक्ती दिलेली आहे. एखादी शांत, सुंदर व्यक्ती दिसली की आपल्याला प्रेम भाव, शांतता आणि आत्मीयता वाटते. भगवान शंकर आणि गौतम बुद्धाचा चेहरा आपल्याला शांत सौंदर्याचा साक्षात्कार वाटतो. बेलूरच्या सुरसुंदरींचे विभ्रम मनमोहक वाटतात. खजुराहोतील कामशिल्पे आकर्षक आणि ध्यानस्थ वाटतात. वेरूळच्या उमा-महेश शिल्पात प्रेम आणि आश्वस्तपणा जाणवतो.
याचे कारण आपल्या आत खोल दडलेला आदिमानव जो नेहमी स्वतःला वाचवण्याचा विचार करतो. त्यामुळे आपण राक्षसांचे चेहरे भयानक निर्माण करतो तर देवांचे सुंदर हे आपण आतूनच ठरवत आलो आहोत. मनाच्या त्या आदिम कोपऱ्यात अजूनही सौंदर्य माणसाला सुरक्षित आणि आनंदी करते.
वास्तव
पण आज आपल्या सामाजिक वागण्यात एक ऐतिहासिक आळस आहे, एक गुलामीची हीन भावना आहे. आपल्यावर अत्याचार करणाऱ्यांचा दृष्टिकोन आपण कधीतरी आपलासा करून घेतला आणि त्यालाच संस्कृती म्हणू लागलो. खजुराहोची शिल्पे पाहून कोणी लाजतो, कोणी नाकारतो. पण मसाला सॉंग्ज आणि रस्त्यावरचे भडक नाचाचे( आपल्याकडील सध्याचे स्टेज वरील डान्स तर उत्तरेतील लौंडा डान्स ) कार्यक्रम मात्र राजरोस चालतात. आपल्याच सुंदर इतिहासाला नाकारायचे आणि बाहेरचा कचरा हसत हसत स्वीकारायचा हे कसले संस्कार ?
मुलाच्या लग्नासाठी मुलगी पाहायला गेल्यावर ‘ती जास्त सुंदर असेल तर नको’ कारण तो मग तिच्या प्रेमात पडून आपल्याला सांभाळणार नाही असे म्हणून सोयरीक मोडणारे पालक देखील आहेत. लाल लिपस्टिक लावल्यामुळे हि तर खूपच ऍडव्हान्स असेल या कारणास्तव तिला नापसंत करणारे पण आहेत. पण हेच असे म्हणणारे लोक मोबाइलवर चोरून काय पाहत असतात ? एखादी कलाकार किंवा नर्तकी गावात आली की रेकॉर्डब्रेक गर्दी बायका करत नाहीत. चेंगराचेंगरीत पोरेटोरेच मरतात. मग हा दांभिकपणा कशाचे लक्षण आहे ? ज्या देशाने जगाला प्रेम, शृंगार, योग, आयुर्वेद शिकवले, तेथेच कलेविषयी आणि सौंदर्याविषयी असा तिरस्कार आला कुठून ?
झोपडपट्टीत राहणे, प्रदूषित वस्त्यांमध्ये जगणे ही कोणाचीही निवड नसते, तर ती असते हतबलता. सुट्टी मिळाली की माणसाला निवांत जागांची ओढ लागते कारण सौंदर्य हे आपल्या आत-बाहेर सगळीकडे असणे हा आपला मूलभूत हक्क आहे. आणि त्याची सुरुवात आपण स्वतःपासून करू शकतो.थोडे स्वतःचे लाड करा. आसपास संगीत आणि कलेचा संबंध येऊ द्या. कोणी काही बोलले तर वाईट वाटून घेऊ नका.
गुहेतील मिलनाची चित्रे, मंदिरावरील शिल्पे, कॅनव्हासवरील ललना, सिनेमातील मॉडेल्स अगदी A.I. ने निर्माण केलेल्या भविष्यातील रोबोट सुंदरी हे सगळे आपल्या आसपासच्या माणसांपासून प्रेरणा घेऊनच निर्माण होतात. आपण कितीही नाकारले तरी सौंदर्याने मानवी जीवनाला खोलवर स्पर्श केलेला आहे व्यापारात, कलेत, आनंदात, प्रत्येक पैलूत.
ज्या देशात शिल्पकला इतकी बहरली, त्या देशाने मध्ययुगीन आक्रमकांची रानटीपणाची आणि व्हिक्टोरियन नैतिकतेची मूल्ये कधी आपली मानली ? आणि अजूनही मानतो का ? आपल्या आयुष्यात धर्म, अर्थ आणि काम यांचा अभ्यास राहून गेला असेल, तर आपण फक्त आधार कार्डावर भारतीय आहोत.
ज्याच्या आयुष्यात कला नाही, ज्याचे हृदय सौंदर्य पाहून विव्हळत नाही, पावसाच्या आगमनाने जो ओथंबून येत नाही त्या आयुष्याला निरस नाही तर काय म्हणणार ? दिव्यत्वाचा अनुभव छोट्या छोट्या सुंदर गोष्टींमधूनच घडतो नाही का ?
रवींद्रनाथांनी म्हटल्याप्रमाणे
Beauty is truth’s smile
when she beholds her own face in a perfect mirror.
सौंदर्य हे सत्याचे स्मितहास्य आहे .
लेखन आणि छायाचित्र : योगेश कर्डीले
मॉडेल : के. रागिणी योगेश
By accessing this content, you agree to not download, screenshot, redistribute, repost, alter, illustrate, paint, trace, use as reference, manipulate, or share it in any form publicly or privately without my prior, written permission.
This includes:
No AI training or replication
No use in mood boards, NFTs, edits, or fan art
No sharing via messaging apps or forums
No re-uploads on social media or other platforms
No sketches, derivative illustrations, or studies based on this work
This space is sacred. Violations will lead to an immediate ban and legal action if needed. Thank you for respecting the spirit and sanctity of this intimate creative space. 🙏🏽



Comments